मनोज जरांगे यांच्या आघाडीमधून सामाजिक कार्यकर्ते आदमभाई मुजावर शिरोळ विधानसभा लढण्यास इच्छुक
जयसिंगपूर/ प्रतिनिधी
स्वराज्यक्रांती जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आदमभाई मुजावर हे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आघाडीमधून शिरोळ विधानसभा लढविण्यास इच्छुक आहेत. लवकरच स्वराज्यक्रांती जन आंदोलनचे कार्यकर्ते अंतरवाली चराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेऊन उमेदवारी मागणार आहेत.
आदमभाई मुजावर यांनी शिरोळ तालुक्यातील जनतेच्या निगडित असणाऱ्या प्रश्नावर आतापर्यंत अनेक निषेध सभा, आंदोलने, मोर्चे, बेमुदत उपोषण लोकशाही मार्गातून केले आहेत. झोपडपट्टी धारक, कामगार, व्यावसायिक, विविध क्षेत्रातील नोकरदार याचबरोबर सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जयसिंगपूर नगरपालिका, पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी, संबंधित सरकारी अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक निवेदने दिली आहेत. प्रसंगी बेमुदत उपोषणाचे शस्त्र हाती घेऊन लोकांना त्यांचे हक्क आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. आम आदमी पार्टी, स्वराजक्रांती जन आंदोलन याचबरोबर विविध सामाजिक चळवळीशी बांधील राहत लोकशाही आणि संविधान वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत आणि त्यांच्या सुखदुःखात धावून जाणारा एक ‘हक्काचा माणूस’ अशी त्यांची प्रतिमा जन माणसात तयार झाली आहे.
आदम मुजावर यांनी स्वराज्य क्रांती जन आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या विषयावर वेळोवेळी आंदोलने करून सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले होते. शिरोळ तालुका मराठा मंडळाने त्यांना याप्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य केले होते. मुस्लिम कार्यकर्ता असूनही मराठा, बहुजन समाजाने आदम मुजावर यांच्या सामाजिक चळवळीला नेहमीच हातभार लावला आहे आणि प्रोत्साहनही दिले आहे.
आगामी काळात शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय बाळगून विधानसभेसाठी आदम मुजावर यांनी तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधात एक सक्षम पर्याय म्हणून मनोज जरांगे पाटील यांची आघाडी निवडणुकीत चांगला पर्याय उपलब्ध करून देऊ शकते आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने योगदान देऊ शकते.
तसेच मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातत्याने आंदोलन करीत असताना मुस्लिम आणि बहुजन समाजालाही न्याय हक्क मिळावेत यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालले आहेत. त्या अनुषंगाने वेळोवेळी त्यांनी मराठा समाजासह मुस्लिम आणि बहुजन समाजाचा उल्लेख केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य व बरोबर असल्याने त्यांच्या आघाडीतून एक मुस्लिम मावळा म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय आदम मुजावर यांनी घेतला आहे.
स्वराज्यक्रांती जन आंदोलनाचे कार्यकर्ते लवकरच मनोज जरांगे यांची भेट घेऊन उमेदवारी मागणार आहेत.