शिरोळ येथे राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराच्या व्याख्यानमालेची सांगता
शिरोळ / प्रतिनिधी
मी आणि माझ्यापुरते ही विचारधारा बोकाळत निघाली आहे.त्यामुळे विचार मतभेदातून नाती दूर जाताना दिसतात मुलानी बापाचे कष्ट, यातना समजून घेण्याची गरज असून लहानाची मोठी झालेली मुलं आज आई-वडिलांना पाहतील की नाही अशी स्थिती आहे.हे चित्र बदलायचे असेल तर आईमध्ये माता सावित्री आणि बापामध्ये महात्मा ज्योतिबा दिसले पाहिजेत.केवळ खाणं आणि ऐष करून आयुष्य काढणारी मुलं आई-बापाचं भलं करणार नाहीत.त्यामुळे जन्मदात्या मुलापेक्षाही निराधार व गोरगरीबांचं एखादं मूल दत्तक घेतलं तर मोठं पुण्याईचं काम होईल.मुलानो,बाप समजून घेताना त्यांना दुःख देऊ नका.आईचे महत्व आणि बापाचा त्याग जाणून घ्या असे मत डॉ स्वाती शिंदे (विटा) यांनी व्यक्त केले.येथील छत्रपती शिवाजी चौकातील पटांगणात राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेत “बाप समजून घेताना”….या विषयावर त्या बोलत होत्या.प्रा माधुरी सचिन माळी यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चारुशीला संजय पुजारी होत्या.शतकोतर राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराच्या वतीने 23 जानेवारीपासून सुरू झालेल्या व्याख्यानमालेची सांगता शुक्रवारी झाली.या व्याख्यानमालेत सौ राणी पाटील यांचे आजच्या युगात स्त्रियांची भूमिका या विषयावर व्याख्यान झाले.विजय जाधव यांचे बहारदार कथाकथन तर एस बी ओऊळकर यांनी संत वाडःमय परिचय याविषयी व्याख्यान दिले. सलग चार दिवस झालेल्या या व्याख्यानमालेस श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या टारे उद्योग समूहाच्या प्रमुख स्नेहल अतुल टारे,गटशिक्षणाधिकारी भारती कोळी,माजी उपनगराध्यक्षा कमलाबाई शिंदे,राष्ट्रीय खेळाडू मुक्ता कळेकर,आदर्श मुख्याध्यापिका कल्पना काळे,उद्योजिका
सुप्रिया पाटील,ऋतुजा शेट्टी,देविका मोरे,डॉ सारिका माने,प्राजक्ता गोंदकर,वेदांतिका पाटील, अन्नपूर्णा कोळी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रा अण्णासाहेब गावडे यांनी स्वागत करून संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.प्रा कल्पना पंडीत काळे यांनी आभार मानले.वाचनालयाच्या संचालिका जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले.