संभाजीपुर येथे मनसेचे भिक्षा मागो आंदोलन

तब्बल पाच तास प्रतिक्षा करून देखील कोणतेही जबाबदार पदाधिकारी ग्रामपंचायतीत आले नाहीत.जे शिष्टमंडळ सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना भेटण्यासाठी आले होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आलेले शिष्टमंडळ पाच तास प्रतिक्षा करून भिक्षा मागो आंदोलन करून ग्रामपंचायत कार्यालयासमोरच भोजन केले.असा प्रकार शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर येथे घडला.भिक्षा मागो आंदोलन,भोजन आंदोलन आणि ग्रामपंचायतीचा निषेध या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांनी केले.संभाजीपूरमधील अनेक मुलभूत सुविधा प्रलंबित आहेत.अनेक ग्रामस्थांनी मागणी करून देखील जरूरीची विकासकामे होत नाहीत. अनेक ठिकाणी गटारी, रस्ता याची कामे प्रलंबित आहेत. काही मिळकतधारकांच्या मोठ्या समस्या आहेत.काही भूखंड धारकांच्या भागात रस्त्याची सुविधा देखील उपलब्ध नाही.अशा काही प्रश्‍नांसंबंधी ग्रामपंचायतीला मनसेच्या शिष्टमंडळाने भेट देण्याचे निश्‍चित केले होते.काही प्रश्‍नांबाबत मनसेच्यावतीने मागील अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला जात आहे.तथापी, यासंबंधी अद्यापही कोणताही तोडगा निघाला नाही. या पार्श्‍वभूमीवर मनसेचे शिष्टमंडळ संभाजीपूर ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पोहचले.यावेळी ग्रा.पं.कार्यालयात केवळ दोन कर्मचारी होते.सरपंच,ग्रामसेवक,उपसरपंच व एकही ग्रा.पं.सदस्य कार्यालयात उपस्थित नव्हते.मनसेच्या शिष्टमंडळाचे प्रमुख भगवंत जांभळे यांनी सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला.तथापी, योग्य प्रतिसाद मिळाला नाही. सरपंचांनी दिड तासात येईन,असे सांगितले. तथापी, तब्बल चार तास उलटले तरी देखील कोणीही जबाबदार पदाधिकारी शिष्टमंडळाला सामोरे जाण्यासाठी ग्रा.पं.कार्यालयात आले नाहीत.अधिक काळ प्रतिक्षा करून देखील ग्रा.पं.पदाधिकारी हजर झाले नाहीत. याच्या निषेधार्थ दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी ग्रा.पं. कार्यालय परिसरातील घराघरात भिक्षा मागो आंदोलन केले.भिक्षा मागून शिष्टमंडळातील पदाधिकार्‍यांनी ग्रा.पं. कार्यालयासमोर भोजन केले.या आंदोलनानंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष,कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की,अत्यंत निष्काळजीपणे संभाजीपूर ग्रामपंचायतीचे काम चालू आहे.ग्रा.पं.पदाधिकार्‍यांनी आपण लोकप्रतिनिधी आहोत,याची जाणीव ठेवली पाहिजे.भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला जर सकारात्मक प्रतिसाद मिळत नसेल तर मनसेच्यावतीने निषेध नोंदवून येणार्‍या काळात मनसे स्टाईलने अधिक आक्रमक आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल.यावेळी मनसेच्या सहकारसेनेचे शहर अध्यक्ष महेश पोरे,शहर सचिव ऋषिकेश पाटील,विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष अनुप दाईंगडे,स्वयंरोजगार शहर संघटक योगेश चव्हाण, अभिजीत चराटे,बाळासाहेब जाधव यांच्यासह जेष्ठ पत्रकार महेश कुंभार उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!