राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीला चौपट मोबदला देण्याची मागणी
शिरोळ / प्रतिनिधी
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते उदगांव या महामार्गाच्या भुसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेकडून कार्यवाही करण्यात येत आहे.भुसंपादनामध्ये संपादित केल्या जाणार्या जमीनींना राज्य शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे दुप्पट मोबदला दिला जाणार आहे.यामुळे ३८ किलोमीटरच्या रस्त्यासाठी जुन्या कायद्याप्रमाणे चौपट मोबदला देवूनच जमीनी संपादित कराव्यात.अशा मागणीचे निवेदन भुसंपादन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.या निवेदनात असे म्हटले आहे की, रत्नागिरी ते नागपूर या ९५४ किलोमीटरच्या महामार्गातील जवळपास ९०७ किलोमीटरचे संपूर्ण भुसंपादन हे चौपटीने झालेले आहे. या मार्गावरील जी जमीन संपादित होणार आहे. यात मात्र चोकाक ते उदगांव पर्यतच्या शेतकर्यांना दुप्पट भरपाई दिले जाणार असल्याचे सांगितले आहे.यात बहुतांशी शेतकरी हे अल्पभुधारक आहेत.अनेक शेतकर्यांच्या जमीनीमधून रस्ता गेल्याने त्या जमीनींचे तुकडे होणार असून अनेक शेतकरी भुमिहीन होणार आहेत.सध्या शासनाकडून दिला जाणारा मोबदला हा अत्यल्प असून जमीनी बरोबर, घरे, पाईपलाईन, झाडे, गोठा, अतिक्रमण जागेत गेल्या अनेक वर्षापासून बांधलेली घरे व इतर बाबींचा मोबदलाही पुर्वीप्रमाणे म्हणजेच रत्नागिरी ते चोकाक मधील शेतकर्यांना ज्याप्रमाणे देण्यात आले आहे त्याप्रमाणे अदा करण्यात यावे. त्याबरोबरच सदरचे भुसंपादन करत असताना जी जमीन संपादित केली जाणार आहे. त्या जमीनीचे व शिल्लक जमीनीचे सरकारी मोजणी करून हद्दी निश्चीत करून देण्यात यावे असे म्हटले आहे.यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष रामचंद्र शिंदे, विक्रम पाटील, मिलिंद मगदुम, सचिन चौगुले, प्रविण वळविडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.