ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्यक्षिकासह जनजागृती
सहा विधानसभा मतदारसंघात तालुका प्रशासन सज्ज
हातकणंगले लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू
शिरोळ / प्रतिनिधी
आगामी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघामध्ये ईव्हीएम व व्हीव्ही पॅट मशीनसंदर्भात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्यक्षिकासह जनजागृती करण्यात येत आहे.लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर दुसर्या बाजूला जिल्हा प्रशासनाकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे. दरम्यान, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात मुख्य निवडणूक अधिकारी यांनी राज्यामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक व प्रचार राबविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, शिराळा, वाळवा, पन्हाळा-शाहुवाडी या सहा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्याअंतर्गत डिसेंबरपासून ईव्हीएम व व्हीव्ही पॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे काम सुरु आहे.
चौकट-
मोबाईल व्हॅनद्वारे जानजागृती…
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम व व्हीव्ही पॅट मशीनची जनजागृती केली जाणार आहे. ही मोबाईल व्हॅन सर्व मतदान केंद्रांवर भेट देऊन प्रचार व प्रात्यक्षिक केले जाईल. निवडणूक घोषित होईपर्यंत हा जनजागृतीचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. सर्व मतदारांनी मोबाईल व्हॅनद्वारे होणार्या प्रात्यक्षिकप्रसंगी मतदारांनी मतदान करून पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट-
प्रशासनाच्या कार्यालयातही डेमो
जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार कार्यालयात ही ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.त्या ठिकाणी एक कर्मचारी ईव्हीएम व व्हीव्ही पॅटचा डेमो करून दाखविला जाणार आहे. प्रत्येक मतदाराला ईव्हीएमची हाताळणी करता यावी, तसेच मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटचे काम कसे असते याची माहिती या माध्यमातून मिळणार आहे.