राजापूर बंधाऱ्याची अखेरची घटका! पडझड झालेल्या बंधाऱ्यावर आता चोरट्यांचा डल्ला; २१ बरगे लंपास!

Spread the love

राजापूर बंधाऱ्याची अखेरची घटका! पडझड झालेल्या बंधाऱ्यावर आता चोरट्यांचा डल्ला; २१ बरगे लंपास!

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष की प्रशासनाला मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा? अवजड वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात; कुरुंदवाड पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

राजापूर /प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्याला वरदान ठरलेला आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला राजापूर बंधारा सध्या अक्षरशः अखेरची घटका मोजत आहे.बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचे साईड कट्टे पूर्णपणे ठिसूळ झाले असून, दगडी बांधकामाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यातच रात्री अज्ञात चोरट्यांनी बंधाऱ्याचे तब्बल २१ बरगे चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आधीच दुरवस्थेमुळे चर्चेत असलेल्या बंधाऱ्यावर आता चोरट्यांनीही डल्ला मारल्याने पाटबंधारे विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

राजापूर बंधारा हा शिरोळ तालुक्यातील शेती, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या बंधाऱ्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचे साईड कट्टे कमकुवत झाले असून, दगडी बांधकाम निखळून पडत आहे. काही ठिकाणी बांधकामाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. तरीही या मार्गावरून दररोज नागरिकांसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे.

विशेष म्हणजे, बंधाऱ्याची अवस्था पाहता एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. जीव मुठीत धरून या बंधाऱ्यावरून ये-जा करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाटबंधारे विभागाला या पडझडीचे गांभीर्य कधी कळणार? मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संकटात भर!

सध्या पाण्याची टंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नागरिकांसह शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. अशा परिस्थितीत राजापूर बंधाऱ्याची दुरवस्था आणि २१ बरग्यांची चोरी ही गंभीर बाब मानली जात आहे. बरगे चोरीला गेल्याने बंधाऱ्याच्या पाणी अडविण्याच्या व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेची तातडीने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

कृषी पंपांच्या केबल चोरीनंतर आता बंधाऱ्याचे बरगेही चोरीला!

शिरोळ तालुक्यात यापूर्वी कृषी पंप केबल चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त झाले असतानाच आता थेट बंधाऱ्याचे २१ बरगे चोरीला गेल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे चित्र आहे. या घटनेमुळे कुरुंदवाड पोलिसांसह पाटबंधारे विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बरग्यांची चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन चोरीचा तपास करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, राजापूर बंधाऱ्याची तातडीने पाहणी करून धोकादायक बांधकामाची दुरुस्ती करावी, आवश्यक तेथे नवीन बांधकाम करावे, अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय घ्यावा आणि चोरीला गेलेले बरगे शोधून पुन्हा बसवावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येऊन उपयोग काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!