ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी श्री दत्त साखर सरसावले; खोपटांवर जाऊन मोफत तपासणी व उपचार
शिरोळ / प्रतिनिधी
ऊसतोड हंगामात रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. कारखाना कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांच्या खोपटांवर जाऊन वैद्यकीय पथकाने आरोग्य तपासणी केल्याने मजुरांना मोठा दिलासा मिळाला. कारखान्याच्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे तथा सहायक आयुक्त समाजकल्याण, कोल्हापूर आणि जिल्हा हिवताप कार्यालय, कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, घालवाड यांच्या सहकार्याने दत्तनगर, शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर हे शिबिर घेण्यात आले.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री दत्त आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने शिबिराची सुरुवात केली. यावेळी वैद्यकीय पथकाने ऊसतोड मजुरांच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या खोपटांवर प्रत्यक्ष भेट दिली. प्रत्येक मजुराच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यकतेनुसार प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.
ऊसतोड मजूर ऊन, वारा आणि प्रतिकूल परिस्थितीत मेहनत घेत असतात. हंगामाच्या धावपळीत अनेकदा त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन थेट त्यांच्या निवासस्थानी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिरासाठी आरोग्य सहाय्यक श्रीकांत निर्मळे, स्टाफ नर्स सौ. भाग्यश्री भोसले, आया सौ. प्रमिला गायकवाड आणि रुग्णवाहिका चालक सिकंदर सुतार यांनी विशेष सहकार्य केले.