नागाव येथे नाष्टा सेंटर फोडणारे तीन परप्रांतीय चोरटे गजाआड; ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

नागाव येथे नाष्टा सेंटर फोडणारे तीन परप्रांतीय चोरटे गजाआड; ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

नागाव (ता. हातकणंगले) येथील बंद असलेल्या नाष्टा सेंटरचे खोके फोडून ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या तिघा परप्रांतीय चोरट्यांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

बबन रामजग निषाद (वय २७), लवकुश रामजग निषाद (वय २५) आणि राहुल रामजग निषाद (वय २८) तिघेही राहणार मूळगाव. दर्शन नगर, ता. फैजाबाद, जि. अयोध्या, राज्य उत्तर प्रदेश) येथील असून, सध्या नागाव येथील संभाजीनगर भागात अभिषेक जाधव यांच्या घरी भाड्याने अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागाव येथील नीलम हॉटेल ते नागाव गावात जाणाऱ्या रस्त्यावर महेश सावंत यांचे सावंत नाष्टा सेंटर नावाचे खोके आहे. दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री १.५४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या बंद असलेल्या हॉटेलच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी आतील जॅक मार्टिन कंपनीचे २ होम थिएटर (किंमत ३२ हजार रुपये), १० ग्रॅम वजनाचे निळा खडा असलेले चांदीचे ब्रेसलेट कडे (किंमत २० हजार रुपये), किराणा व बेकरी साहित्य (किंमत १५ हजार रुपये), सिक्युअर कंपनीचा १ सीसीटीव्ही कॅमेरा (किंमत १० हजार रुपये), कॅसिओ कंपनीचे १ मनगटी घड्याळ (किंमत ७ हजार रुपये), बजाज कंपनीचा १ कुलर (किंमत ६ हजार रुपये) आणि एच.पी. कंपनीचे गॅस भरलेले १ लोखंडी सिलिंडर (किंमत २ हजार रुपये) असा एकूण ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी फिर्यादी महेश सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. १४ नोव्हेंबर रोजी पहाटे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

चोरीच्या घटनेनंतर महेश सावंत यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित चोरट्याचे फोटो व व्हिडिओ आपल्या मोबाईल स्टेटसला ठेवले होते. दरम्यान, चोरीचे साहित्य शेतवडीतून घरी घेऊन जाताना काही स्थानिक तरुणांनी या तिघांना पाहिले होते. सीसीटीव्ही फुटेजमधील एका संशयिताच्या शर्टशी या तरुणाने घातलेल्या शर्टचे साम्य आढळताच स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखत तिघांनाही त्यांच्या राहत्या खोलीत कोंडून ठेवले. या घटनेची माहिती तातडीने गावकामगार पोलीस पाटील बाबासो पाटील आणि फिर्यादी सावंत यांना देण्यात आली. पोलीस पाटील यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शिरोली एमआयडीसी पोलिसांना संपर्क साधून या तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. त्याना न्यायालयात हजर केले असता त्यानी १६ नोव्हेंबर पर्यंत ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली .

Leave a Comment

error: Content is protected !!