आषाढी यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती; ग्रामरक्षण, आरोग्य आणि मानवकल्याणासाठी देवीला साकडे
शिरोळ | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये ग्रामदैवतांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक गावाची ओळख केवळ इतिहास, परंपरा किंवा संस्कृतीमुळे होत नाही, तर त्या गावाचे रक्षण करणाऱ्या ग्रामदैवतामुळेही होते. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक शिरोळ नगरीची अशीच जागृत आणि नवसाला पावणारी ग्रामदेवता म्हणजे श्री मरगुबाई देवी.अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या देवीच्या यात्रेला धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचे अनन्यसाधारण महत्त्व लाभले आहे.
आषाढ महिन्यात पूर्वाभाद्रपदा नक्षत्रावर भरविण्यात येणारी श्री मरगुबाई देवीची यात्रा म्हणजे संपूर्ण शिरोळ आणि पंचक्रोशीतील भाविकांसाठी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा पर्वणीचा दिवस असतो. यावर्षी आज मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी पारंपरिक विधी, धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात ही यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी होत आहे.
मरगुबाई म्हणजे रोगराईचे निवारण करणारी लोकदेवता
मरगुबाई, मरीआई, जरीआई, कालीमाता अशा विविध नावांनी ओळखली जाणारी ही देवी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पूजली जाते. लोकश्रद्धेनुसार ही देवी गावावर येणाऱ्या साथीच्या रोगांचे निवारण करणारी आणि ग्रामरक्षण करणारी शक्ती आहे.
पूर्वी देवी, पटकी, प्लेग, कॉलरा, तापाच्या साथीसारख्या भीषण महामारींनी अनेक गावे उद्ध्वस्त केली होती. अशा काळात ग्रामस्थांनी या संकटांचे निवारण करणाऱ्या शक्तीस्वरूप देवीची कल्पना केली आणि तिची भक्तिभावाने उपासना सुरू केली. आजही अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात की, शिरोळ गावावर आलेल्या अनेक महामारींचा प्रभाव तुलनेने कमी झाला आणि गावाचे रक्षण झाले, यामागे मरगुबाई देवीची कृपा असल्याचा दृढ लोकविश्वास आहे.
गावाबाहेरील देवीचं पवित्र स्थान
शिरोळच्या जुन्या वेशीबाहेर एका विशाल वडाच्या झाडाखाली श्री मरगुबाई देवीचे प्राचीन मंदिर उभे आहे. पूर्वी साध्या स्वरूपात असलेले हे देवस्थान नुकतेच माजी सरपंच स्व.महादेव पाटील व जय महाराष्ट्र मंडळ, शिरोळ यांच्या पुढाकारातून सुशोभित व जीर्णोद्धारित करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिराचे रूप अधिक आकर्षक आणि भक्तांसाठी सुविधायुक्त झाले आहे.देवीची मूर्ती दगडी पाषाणातील असून तिला शेंदूर लेपलेला आहे. शेंदूर हा शक्ती, पराक्रम आणि रक्षणाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या मूर्तीचे स्वरूप शक्तिरूप आणि ग्रामसंरक्षक देवीचे दर्शन घडवते.
धनगर समाजाकडे पारंपरिक पूजा
या देवस्थानाची पूजा-अर्चा, धार्मिक परंपरा आणि यात्रेतील प्रमुख विधी हे पूर्वापार धनगर समाजाकडे आहेत. अनेक पिढ्यांपासून धनगर समाजातील पुजारी परंपरेने देवीची सेवा करत आहेत. गावातील गावकामगार पोलीस पाटील, मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सर्व धार्मिक कार्यक्रम विधीवत पार पडतात.
प्रत्येक शुभकार्याची सुरुवात देवीच्या दर्शनाने
शिरोळमध्ये कोणतेही शुभकार्य असो-लग्न, गृहप्रवेश, व्यवसायाचा शुभारंभ, नवीन वाहन, शेतीची सुरुवात किंवा इतर मंगलकार्य-प्रथम श्री मरगुबाई देवीचे दर्शन घेऊन श्रीफळ, ओटी, नारळ व नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आजही अखंड सुरू आहे.ग्रामस्थांच्या मते, देवीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे मरगुबाई ही केवळ ग्रामदेवता नसून प्रत्येक घरातील कुलस्वामिनीप्रमाणे पूजली जाते.
यात्रेपूर्वी मंदिरात गोंधळ जागरण
यात्रेच्या आदल्या रात्री श्री अंबाबाई सेवेकरी समस्त गोंधळी परिवार यांच्या वतीने पारंपरिक गोंधळ जागरणाचा धार्मिक कार्यक्रम होतो. देवीच्या महिम्याचे गोंधळ, भारुडे आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने रात्रभर भक्तिमय वातावरण निर्माण होते.हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून लोककलेचे जतन करणारा महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा आहे.
पंचगंगेतून आणले जाणारे पवित्र जल
यात्रेच्या आदल्या दिवशी मध्यरात्री धनगर समाज, गावकामगार पोलीस पाटील, मानकरी आणि ग्रामस्थ पारंपरिक वेशात शिरोळच्या पवित्र पंचगंगा नदीकाठी जातात.धनगरी ढोल, कैताळ, घंटानाद आणि बासरीच्या सुरेल निनादात तांब्याच्या घागरीत पंचगंगेचे पवित्र जल आणले जाते. हा संपूर्ण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतो.या पवित्र जलाने देवीचा महाअभिषेक करण्यात येतो.
महाअभिषेकाचे धार्मिक महत्त्व
पंचगंगेच्या जलासोबत दूध, खारीक, बदाम, खसखस, केळी आणि विविध नैवेद्यांनी देवीचा महाअभिषेक केला जातो. त्यानंतर कडुलिंबाच्या पाल्याने देवीची विशेष पूजा केली जाते.कडुलिंब हा आरोग्य, शुद्धता आणि रोगप्रतिबंधक शक्तीचे प्रतीक मानला जात असल्यामुळे या पूजेला विशेष महत्त्व आहे.
‘चरक’ परंपरा – ग्रामसंरक्षणाचा अनोखा विधी
महाअभिषेकानंतर देवीच्या चरणस्पर्शाने पावन झालेला भंडारा, लिंबू, खारीक, खोबरे आदी पूजासाहित्य गावाच्या सर्व प्रवेशद्वारांवर नेऊन उधळले जाते.या विधीला ‘चरक’ असे म्हटले जाते.लोकविश्वासानुसार या विधीमुळे गावात रोगराई, महामारी आणि अमंगल शक्तींचा प्रवेश होत नाही. ही परंपरा अनेक शतकांपासून आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जात आहे.
‘मरीआईचा गाडा’ – महामारी गावाबाहेर नेण्याची लोकपरंपरा
यात्रेच्या रात्री आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक विधी पार पडतो. गावाच्या प्रत्येक सीमेवर ‘मरीआईचा गाडा’ सोडण्याची परंपरा आहे.या प्रतीकात्मक विधीद्वारे गावातील रोगराई, संकटे आणि महामारी गावाच्या सीमेबाहेर जावीत, अशी प्रार्थना केली जाते. लोकपरंपरेतील हा विधी आजही ग्रामस्थांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे.
नवसाला पावणारी देवी
श्री मरगुबाई देवी नवसाला पावणारी म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. आरोग्य, संतानप्राप्ती, शेती, व्यवसाय, शिक्षण, नोकरी, कौटुंबिक सुख, संकटातून मुक्ती अशा विविध मनोकामनांसाठी भाविक देवीला नवस करतात.मनोकामना पूर्ण झाल्यानंतर यात्रेच्या दिवशी अनेक भाविक पारंपरिक पद्धतीने नवस फेडतात.
महिलांची भक्तीपूर्ण पूजा
यात्रेच्या दिवशी गावातील सुवासिनी, माहेरवाशिणी आणि महिला भगिनी देवीला साडी-चोळी, ओटी, खण, नारळ अर्पण करतात.पुरणपोळी, दहीभात, आंबील आणि विविध पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करून देवीची मनोभावे आराधना केली जाते. या दिवशी मंदिर परिसरात भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते.
पालखी सोहळ्याने दुमदुमते शिरोळ
दुपारनंतर देवीची उत्सवमूर्ती सुशोभित पालखीत विराजमान केली जाते. रंगीबेरंगी फुलांनी सजलेली पालखी, धनगरी ढोलांचा घुमणारा नाद, भंडाऱ्याची उधळण आणि ‘मरगुबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात संपूर्ण शिरोळ नगरीत नगरप्रदक्षिणा काढली जाते.प्रत्येक घरासमोर पालखी थांबते.भाविक देवीचे दर्शन घेऊन ओटी भरतात आणि आशीर्वाद घेतात.हा सोहळा ग्रामएकात्मतेचे जिवंत प्रतीक मानला जातो.
धनगरी ओव्या आणि भाकणूक
रात्री मंदिर परिसरात धनगरी ओव्या, पारंपरिक ढोलवादन आणि जागरणाचा कार्यक्रम होतो.यानंतर वर्षभरातील घडामोडी, पाऊस, शेती, ग्रामस्थिती याबाबत लोकपरंपरेनुसार ‘भाकणूक’ सांगितली जाते. ही परंपरा आजही भाविक मोठ्या श्रद्धेने ऐकतात.
लोकसंस्कृतीचा अमूल्य वारसा
श्री मरगुबाई देवीची यात्रा ही केवळ धार्मिक उत्सव नसून शिरोळच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकपरंपरेचा अमूल्य वारसा आहे. धनगर समाज, गोंधळी समाज, गावकामगार पोलीस पाटील, मानकरी, महिला मंडळे आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ही परंपरा जपतात.यात्रेमुळे सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि ग्रामसंस्कृतीची जपणूक अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
मानवकल्याणासाठी देवीला साकडं
यंदाच्या यात्रेनिमित्त श्री मरगुबाई देवीसमोर गावाच्या तसेच संपूर्ण मानवजातीच्या आरोग्य, सुख-समृद्धी आणि कल्याणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.कोणतीही महामारी, रोगराई, नैसर्गिक आपत्ती, महापूर, दुष्काळ किंवा अन्य संकट गावावर येऊ नये, प्रत्येक कुटुंब सुखी राहावे, शेतकरी समृद्ध व्हावेत आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी सामूहिक प्रार्थना भाविकांनी केली.
भक्तिभावाने दुमदुमलेले मंदिर
यात्रेदिवशी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.अभिषेक,आरती,पालखी सोहळा,गोंधळ, भंडाऱ्याची उधळण, नगरप्रदक्षिणा आणि विविध धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
“मरगुबाईच्या नावानं चांगभलं… जय हो… मंगल हो…” या जयघोषाने शिरोळ नगरी दुमदुमून गेली.
ग्रामदैवत ही केवळ श्रद्धेची प्रतिमा नसते, तर ती गावाच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि सामूहिक जीवनमूल्यांची जपणूक करणारी शक्ती असते.शिरोळची जागृत ग्रामदेवता श्री मरगुबाई देवी हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. शतकानुशतके सुरू असलेल्या परंपरा, लोकश्रद्धा,धार्मिक विधी आणि ग्रामएकात्मतेचा संदेश देणारी ही यात्रा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.मरगुबाई देवीच्या चरणी सर्वांच्या आयुष्याला आरोग्य, आनंद, समृद्धी आणि मंगलमय भवितव्य लाभो, हीच प्रत्येक भाविकाची प्रार्थना आहे.
माहिती व शब्दांकन
सचिन उर्फ शशिकांत शहाजी पवार, शिरोळ