शिरोळ | प्रतिनिधी
आषाढी वारी म्हणजे श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा उत्सव. या सेवाभावाला साजेसा आदर्श उपक्रम शिरोळ डॉक्टर्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी, शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. श्रीक्षेत्र पंढरपूरकडे पायी निघालेल्या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत देण्यात आली.
सन २०१६ पासून अखंडपणे सुरू असलेल्या या सेवाभावी उपक्रमामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. दीर्घ अंतर पायी चालताना अनेक वारकऱ्यांना थकवा, अशक्तपणा, ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, चक्कर येणे अशा विविध आरोग्यविषयक तक्रारी उद्भवतात. याची दखल घेत डॉक्टरांच्या पथकाने वारकऱ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब मोजणी, जखमी वारकऱ्यांची मलमपट्टी तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार केले. या सेवेमुळे अनेक वारकऱ्यांना प्रवासात नवचैतन्य मिळाले.
शिबिरात डॉ. सतीश कुंभार, डॉ. चेतन राजोबा, डॉ. शेखर पाटील, डॉ. प्रमोद हेगडे, डॉ. प्रिन्सकुमार रजपूत, डॉ. अनिरुद्ध सुतार आणि डॉ. अतुल पाटील यांनी वैद्यकीय तपासणी करून वारकऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. अमित पोतदार आणि अरविंद चौगुले यांनी जखमी वारकऱ्यांची मलमपट्टी, सेवासुश्रूषा आणि आवश्यक वैद्यकीय सहाय्य पुरवले.
हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. डॉ. अमरसिंह माने देशमुख, डॉ. कुलभूषण चौगुले यांच्यासह रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी, शिरोळचे पदाधिकारी व सदस्य यांनी नियोजन आणि अंमलबजावणीत मोलाचे योगदान दिले. तसेच महांकाली फार्मास्युटिकलचे संजय माने यांनीही औषधोपचारासाठी आवश्यक सहकार्य केले.
वारकऱ्यांच्या सेवेला ईश्वरसेवेचे स्वरूप मानत सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. सेवाभाव, संवेदनशीलता आणि वैद्यकीय जबाबदारी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या कार्याबद्दल वारकरी आणि नागरिकांनी शिरोळ डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लबच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. आषाढी वारीच्या निमित्ताने दिलेली ही आरोग्यसेवा वारकऱ्यांच्या प्रवासाला सुरक्षित आणि सुखकर बनविणारी ठरली.