नीट परीक्षेत घवघवीत यश; कु. सूर्या सुभाष पाटील यांचा ग्रामपंचायत व महाडिक गटाकडून गौरव
पुलाची शिरोली / प्रतिनिधी
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून पुलाची शिरोली गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल करणाऱ्या कु.सूर्या सुभाष पाटील यांचा पुलाची शिरोली ग्रामपंचायत व महाडिक पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी सूर्या यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद सदस्य सलीम महात यांच्या हस्ते कु. सूर्या पाटील यांना पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे, उपसरपंच विजय जाधव, डॉ. सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य महादेव सुतार, सागर कौंदाडे, योगेश खवरे, दीपक यादव, बटील देसाई, हिदायत पटेल, बाळासो पाटील, संदेश शिंदे, संपत संकपाळ, शिरोली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय पाटील, धनाजी पाटील, अजित देशपांडे, नितीन चव्हाण, युवा नेते सागर मोरे, सुशांत गुरव, सचिन गायकवाड व संदीप तानवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी कु. सूर्या पाटील यांच्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून कठोर परिश्रमाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण सूर्या यांनी घालून दिल्याचे वक्त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुलाची शिरोलीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने नीटसारख्या कठीण परीक्षेत मिळविलेले यश ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्याबरोबरच इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय व उच्च शिक्षण क्षेत्राकडे प्रेरित करण्याचा हा उपक्रम असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमास ग्रामस्थ, युवक, विद्यार्थी, पालक आणि महाडिक पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारानंतर उपस्थितांनी कु. सूर्या सुभाष पाटील यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. हा गौरव सोहळा गावातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.