शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि.२९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या कै.दिनकररावजी यादव सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्षा सौ.योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण १६ विषयांवर चर्चा होऊन विविध निर्णय घेतले जाणार आहेत. सभेमध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून कलेंश्वर तलाव परिसराचे सुशोभीकरण व विविध विकासकामे हाती घेण्याबाबत चर्चा होणार आहे. शहरातील पर्यटनवाढीस चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांसाठी आवश्यक तांत्रिक सल्लागार नेमण्याचा विषयही सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गट नंबर २३३ मधील जागेवर घरकुल प्रकल्प उभारण्याबाबत निर्णय अपेक्षित आहे.याशिवाय आगामी जनगणना २०२७ च्या कामकाजासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणे, शहरातील अंगणवाडी इमारतींसाठी निधी खर्चास मंजुरी देणे,तसेच पाणीपुरवठा विभागासाठी नवीन टँकर खरेदी करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.नगरपरिषदेकडील जुने साहित्य व निष्क्रिय वाहनांचा लिलाव करणे,विद्युत विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून देणे,तसेच कायदेशीर सल्लागाराच्या मुदतवाढीस मंजुरी देण्याबाबतही सभेत विचारविनिमय केला जाणार आहे.शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार असून विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी मागील सभेच्या इतिवृत्तालाही मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली.