शिरोळ / प्रतिनिधी
कर्तव्यनिष्ठा, संयम आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सलग २७ वर्षे अपघातमुक्त सेवा बजावणारे शिरोळचे सुपुत्र तथा राज्य परिवहन मंडळाच्या कुरुंदवाड आगारातील चालक बाबासो मुसा जमादार यांना राज्य परिवहन मंडळाकडून “२५ वर्षे सुरक्षित सेवेचा बिल्ला” जाहीर झाला आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सोमवारी कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.बाबासो जमादार यांनी कुरुंदवाड आगारात चालक म्हणून सेवेला सुरुवात केली. सेवाकाळात त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि दक्षतेने एसटीची धुरा सांभाळली. गेली २७ वर्षे त्यांनी एकही अपघात न घडवता प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची अनुभूती दिली आहे. त्यांच्या सेवेमुळे प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, सहकारी कर्मचाऱ्यांमध्येही त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.कुरुंदवाड ते पुणे, मुंबई, पणजी अशा लांब पल्ल्याच्या मार्गांवरही त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत एसटी सेवा दिली आहे. कठीण हवामान, लांबचा प्रवास आणि ताणतणावाच्या परिस्थितीतही त्यांनी कर्तव्य बजावत सुरक्षित सेवा कायम ठेवली. त्यामुळेच त्यांच्या या कार्याची दखल राज्य परिवहन मंडळाने घेत त्यांना सुरक्षित सेवेचा सन्मान जाहीर केला आहे.महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे सक्रिय सभासद म्हणूनही बाबासो जमादार यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. चालक म्हणून सेवा बजावत असतानाच संघटनात्मक कार्यातही त्यांनी सहभाग घेतला आहे.या सन्मान सोहळ्यात त्यांना २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार असून त्यांच्या पत्नीचा साडी, खण व नारळाची ओटी देऊन गौरव करण्यात येणार आहे. राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.बाबासो जमादार यांना सुरक्षित सेवेचा बिल्ला जाहीर झाल्याने शिरोळ तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचा सर्व स्तरातून गौरव केला जात आहे.