इचलकरंजी / प्रतिनिधी
बकरी ईद जवळ आल्याने शहरात विविध भागांत बकऱ्यांच्या बाजारांना सुरुवात झाली असून, यंदा मात्र एका अनोख्या बकऱ्याने संपूर्ण इचलकरंजीकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. शहरातील सरस्वती हायस्कूल परिसरात ठेवण्यात आलेल्या एका बकऱ्याने चक्क दूध दिल्याचा दावा करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. “दूध देणारा बकरा” पाहण्यासाठी दिवसभर नागरिकांची रांग लागल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळाले.इचलकरंजीतील इस्माईल समडोळे आणि बाळासाहेब देशमुख या दोन सख्ख्या मित्रांनी बकरी ईद निमित्त उस्मानाबादी जातीच्या सुमारे ५० बकऱ्या विक्रीसाठी आणल्या आहेत. गरीब आणि सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना परवडणाऱ्या दरात बकरी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने त्यांनी हे उपक्रम राबविल्याचे सांगितले. मात्र या सर्व बकऱ्यांमध्ये असलेल्या एका विशेष बकऱ्यामुळे परिसरात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बकऱ्याने दूध दिल्याचे पाहायला मिळाले. सामान्यतः दूध देण्याचे कार्य शेळी करत असते. त्यामुळे बकराच दूध देत असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींनी या घटनेकडे धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीने पाहत “हा देवाचा चमत्कार आहे” असे मत व्यक्त केले, तर काहींनी हा अत्यंत दुर्मिळ प्रकार असल्याचे सांगितले.या अनोख्या बकऱ्याला पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी प्रत्यक्ष बकरा पाहून मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ चित्रित केले.परिसरात उत्सुकता, कुतूहल आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी समडोळे परिवार, देशमुख परिवार तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.इस्माईल समडोळे यांनी सांगितले की, “दरवर्षी आम्ही बकरी ईदसाठी बकऱ्या विक्रीसाठी आणतो. यंदा उस्मानाबादी जातीच्या ५० बकऱ्या आणल्या आहेत. मात्र यामधील एका बकऱ्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. अनेक नागरिक हा बकरा पाहण्यासाठी येत आहेत.आम्हालाही हा प्रकार अनोखा वाटत आहे.दरम्यान, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांतून व्यापारी इचलकरंजीमध्ये दाखल होत आहेत. शहरात सध्या बकऱ्यांच्या बाजारांना चांगला प्रतिसाद मिळत असून, या “दूध देणाऱ्या बकऱ्याने” मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. शहरात या अनोख्या बकऱ्याचीच चर्चा रंगली असून नागरिकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.