पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
वडगाव ते वडगाव फाटा मार्गावर निष्काळजीपणे टेम्पो चालवून दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हिदायतुल्ला दस्तगीर हजारी (वय ५१) असे जखमीचे नाव आहे. अपघात घडल्यानंतर जखमीला कोणतीही मदत न करता टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : हिदायतुल्ला दस्तगीर हजारी हे आपल्या दुचाकीवरून वडगाव ते वडगाव फाटा मार्गे शिरोलीच्या दिशेने निघाले होते. समोरून येणाऱ्या मालवाहू टेम्पोने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे हजारी यांच्या दुचाकीला उजव्या बाजूला जोराची धडक दिली. ही धडक इतकी मोठी होती की, यामध्ये हिदायतुल्ला हजारी यांच्या डाव्या हाताला आणि खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर माणुसकी दाखवून जखमीला मदत करण्याऐवजी टेम्पो चालक अब्दुल वहाब मेनशनकाई (वय २७, रा. पोंडा, गोवा) हा घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी शकील हजारी यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.