पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली पुलाची येथील समता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. रा. म. महाडिक हायस्कूलची माजी विद्यार्थिनी उमा मोरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेत करसहाय्यक आणि महसूल सहाय्यक अशी दुहेरी कामगिरी करून हायस्कूलच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या यशामुळे शिरोली परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.उमा मोरे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर हे उल्लेखनीय यश संपादन केले. एमपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षेत एकाच वेळी दोन पदांसाठी यश मिळविणे ही मोठी कामगिरी मानली जाते. तिच्या या यशामुळे कै. रा. म. महाडिक हायस्कूलच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.उमा मोरे ही शालेय जीवनापासूनच अभ्यासू, मेहनती आणि ध्येयवेडी विद्यार्थिनी म्हणून परिचित होती. शालेय शिक्षण घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी सातत्याने अभ्यास, योग्य नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे स्वप्न सत्यात उतरवले. तिच्या यशामुळे शाळेतील विद्यमान विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून ‘आपणही मोठे यश मिळवू शकतो’ असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये वाढला आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कौंदाडे (तात्या), ग्रामपंचायत सदस्या हर्षदा यादव, शाळेचे प्रशासन प्रमुख एम. डी. लाड, दीपक यादव तसेच शिक्षिका प्राजक्ता ओऊळकर यांनी उमा मोरे हिच्या घरी जाऊन तिचा कौटुंबिक वातावरणात सत्कार केला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.सत्कार प्रसंगी बोलताना अध्यक्ष प्रकाश कौंदाडे यांनी, “उमा मोरेचे यश हे केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण शाळा आणि परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे उमाने दाखवून दिले,” असे सांगितले.प्रशासन प्रमुख एम. डी. लाड यांनी, “आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवून शाळेचा गौरव वाढवला आहे. उमा मोरेचे दुहेरी यश हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे,” असे मत व्यक्त केले. शिक्षिका प्राजक्ता ओऊळकर यांनी उमाच्या मेहनतीचे कौतुक करत तिच्या यशातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.उमा मोरे हिनेही या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांसह शिक्षकवृंद आणि मार्गदर्शकांना दिले. “शाळेने दिलेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळेच हे यश मिळाले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्य आणि संयम ठेवला तर यश नक्की मिळते,” असे तिने यावेळी सांगितले.उमाच्या या यशामुळे शिरोली परिसरात आनंदाचे वातावरण असून अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्याचा संदेश तिच्या यशातून मिळत आहे. कै. रा. म. महाडिक हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनीने मिळविलेल्या या दुहेरी यशामुळे शाळेच्या शैक्षणिक परंपरेला नवी उंची मिळाली असून हे यश भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.