पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
मुलीला वारंवार फोन का करतोस ? असा जाब विचारल्याच्या रागातून तिघांनी मिळून मुलीच्या वडिलांनाच लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. या घटनेमूळे हालोंडी (ता. हातकणंगले) येथे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात अविनाश भाऊसो पाटील (वय ४१) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादनुसार शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रणव अण्णासो पाटील, अण्णा महावीर वागणे व समेंद्द अण्णासो पाटील ( सर्व रा. हलोंडी, ता. हातकणंगले ) या तीघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली फाटा येथील लक्ष्मी टाईल्स जवळ सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : अविनाश पाटील यांनी प्रणव अण्णासो पाटील याला “तू माझ्या मुलीला फोन का करतोस? हे वागणे बरोबर नाही, मी तुझ्या वडिलांना सांगेन,” असे म्हणून समज दिली होती. याचा राग मनात धरून प्रणव पाटील आणि अण्णा महावीर वागणे यांनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रणवने त्याचा भाऊ समेंद्द पाटील याला बोलावून घेतले. समेंद्द हा आपल्या दुचाकीवरून दोन लोखंडी पाईप घेऊन त्या ठिकाणी आला. यावेळी आरोपींनी फिर्यादीला पाठीमागून पकडून त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि डाव्या डोळ्याच्या भुवईवर लोखंडी पाईपने जोरात प्रहार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.