पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली पुलाची येथील श्री काशिलिंग बिरदेव, म्हसोबा यात्रा तसेच पीर अहमदसो व बालेचांदसो उरुसानिमित्त आयोजित भव्य कुस्ती दंगल उत्साहात पार पडली. शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने झालेल्या या दंगलीत पुणे येथील मल्ल वैभव माने याने सांगलीच्या महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील याला घुटना डावावर शानदार चितपट करत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीचा मान पटकावला. या दमदार लढतीने उपस्थित कुस्तीप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन श्रीकांत भोसले यांनी मनोज माने यांच्यावर मात केली, तर तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत तेजस मोरे यांनी सुदेश ठाकूर यांना पराभूत करत आपले वर्चस्व सिद्ध केले. दंगलीत जवळपास ५० हून अधिक कुस्त्या रंगल्या. काही कुस्त्यांमध्ये चुरशीची झुंज पाहायला मिळाली, तर काही लढती तुल्यबळ झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहिली.प्रथम क्रमांकाच्या विजेत्या वैभव माने यांना माजी आमदार महादेवराव महाडिक (आप्पा) यांच्या हस्ते अभिजित कोळी व अविनाश कोळी यांच्या वतीने अनिल कोळी यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा प्रदान करण्यात आली. याशिवाय ग्रामपंचायतीच्या वतीनेही बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.यावेळी सरपंच प्रतिनिधी तथा माजी उपसरपंच कृष्णात करपे, उपसरपंच विजय जाधव, वडगाव बाजार सभापती सुरेशराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील, बाजीराव पाटील, दीपक यादव, योगेश खवरे, संदेश शिंदे, धनाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.दंगलीतील इतर लढतींमध्ये आर्यन रानगे, आदित्य नायकवडी, बाळकृष्ण मुलगुंडे, मनोज पुजारी, धनंजय पाटील, समर्थ पाटील, आदेश तिरपणे, कार्तिक रानगे, कार्तिक पाटील, यश माणगावे, शुभम चौगुले आणि नवनाथ ऐवळे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत कौशल्य दाखविले.या कुस्ती दंगलीला जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, दिलीपराव पाटील, अनिल शिरोळे, महादेव सुतार, श्रीकांत कांबळे, संपत संकपाळ, महंमद महात, हिदायत पटेल, शिवाजी समुद्रे, आरिफ सर्जेखान, बटील देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धकांचे कौतुक केले. परंपरा, श्रद्धा आणि ग्रामीण क्रीडासंस्कृतीचा संगम असलेल्या या कुस्ती दंगलीने यात्रोत्सवाला वेगळीच रंगत आणली.