इचलकरंजी / प्रतिनिधी
स्व. हरीष बोहरा यांच्या स्मृतींना उजाळा देतानाच विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाने स्पर्धांच्या माध्यमातून केलेला प्रयत्न प्रेरणादायी आहे.अशा स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरतील, अशी अपेक्षा बालाजी शिक्षण समुहाचे संस्थापक मदन कारंडे यांनी व्यक्त केली.इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने उद्योगपती स्व.हरिष बोहरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला एक नवा आयाम दिला असून स्पर्धांचा उद्घाटन सोहळा श्री बालाजी हायस्कूल येथे श्रीमती सोनल बोहरा,यश बोहरा व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. कारंडे बोलत होते.अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल आंबी होते. शहरातील विविध 10 शाळांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत व प्रास्ताविक स्पर्धाप्रमुख विजय चव्हाण यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका सौ.एम.एस.रावळ, उपमुख्याध्यापक डी.वाय.नारायणकर यांच्यासह श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी,सदस्य व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.सूत्रसंचालन एस.बी.शिंदे यांनी केले. आभार एन.डी.चौगुले यांनी मानले.