पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीसमोर दुपारी ३ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या रेडिमिक्सर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली , तर एकजण गंभीर जखमी झाला. मयत महिला ही नवे पारगाव गावची असून ती लिफ्ट घेवून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात होऊन तीचा मृत्यू झाला.पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि मयत महिलेचे नाव वैशाली सुनील माने ( वय ४० रा नवे पारगाव ता हातकणंगले ) असे असून माने या टोप-पेठवडगाव रस्त्यावरील संभापूर गावच्या चिन्मय फाट्यावर कोल्हापूरला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी भुये ता करवीर येथील सचिन सुंदर कांबळे हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम एच ०९ डी क्यू ७९०१ ने पेठवडगावहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी वैशाली यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली आणि त्या दुचाकीवर पाठीमागे बसल्या. दोघेही टोप ग्रामपंचायतीसमोरील उतारावरून जात असताना, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या रेडीमिक्सर ट्रक क्रमांक एम एच 48 टी 8705 ने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले.दुर्दैवाने ट्रकने धडक दिल्याने वैशाली माने यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक कांबळे यांच्या पायावरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जखमी कांबळे यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.