थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया जाहीर
बीड / प्रतिनिधी
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्या वसुलीदारांचा ससेमिरा कमी होण्याचं नाव घेत नाही.अगोदरच जीएसटीच्या थकबाकीसाठी वैद्यनाथ कारखान्यावर आरआरसीची कारवाई सुरु असतानाच आता युनिअन बँकेनंही कारखान्याकडे तब्बल 203 कोटींच्या थकबाकीसाठी थेट कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केलीय.त्यासाठीची जाहिरात करण्यात आली आहे.25 जानेवारी रोजी हा लिलाव ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय.दरम्यान ऑक्टोबर महिन्यात 19 कोटी रुपयांच्या थकीत जीएसटी प्रकरणी कारखान्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती.समर्थकांनी त्यांच्यासाठी मदत देऊ केली होती. मात्र, पैसे नको, आशिर्वाद द्या, असं म्हणत भाजपा नेत्या मुंडेंनी आर्थिक मदत नाकारली होती.त्याचकाळात बँकेनं कारखान्याकडे थकीत कर्जासाठी कारवाईसाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील प्रक्रिया सुरू केली होती.बँकेनं जप्तीच्या याचिका दाखल केल्या होत्या.मात्र सदरचं प्रकरण वेगळ्या न्यायिक खंडपीठासमोर सुरू झाल्याबद्दल सांगत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेची याचिका फेटाळली होती.त्यानंतर आता बँकेनं थेट कारखान्याच्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध केलीय.केंद्र सरकारनं राष्ट्रीय सहकार विकास निगम लिमिटेड मार्फत राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांना मार्जीन लोन दिलंय.यात काँग्रेस नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे.मात्र,वैद्यनाथचा या कर्जासाठी प्रस्ताव असूनही मिळालेलं नाही.याबाबत खुद्द पंकजा मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. आता या संकटातून पंकजा मुंडे कसा मार्ग काढतात याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.