शिरोळातील दुर्गामाता दौडीत तरुणांचा वाढता सहभाग; ‘दौडीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना बळ’ – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव

Spread the love

शिरोळातील दुर्गामाता दौडीत तरुणांचा वाढता सहभाग; शिवभक्तीचा जयघोष, राष्ट्रभक्तीचा जागर!

‘दौडीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना बळ’; उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांचे प्रतिपादन
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दिवसेंदिवस सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर, श्री दुर्गामातेची भक्ती आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणाऱ्या या दौडीमुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. तरुणांमध्ये शिस्त, संस्कार आणि व्यसनमुक्तीची जाणीव निर्माण करण्यासाठी दुर्गामाता दौड महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे प्रतिपादन शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या दौडीमध्ये शहरातील तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. भगव्या ध्वजाच्या साक्षीने होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि श्री दुर्गामातेचा जागर यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध तरुण मंडळे, नागरिक आणि शिवभक्तांकडून दौडीचे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. ठिकठिकाणी दौडीचे स्वागत करून सहभागी धारकांना प्रोत्साहन दिले जात आहे.
मंगळवारी आयोजित दौडीमध्येही तरुणांची मोठी उपस्थिती होती. यानिमित्त पंचायत समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, सौ. ज्योत्स्ना यादव, नगरसेविका सौ. कल्पना काळे, माजी नगरसेवक पंडित काळे, श्रेयस माने, सौ. स्वाती माने, माजी नगरसेवक प्रदीप चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाटील, सुहास मोरे, अमर माने, वजीर कोळी यांच्यासह विविध तरुण मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी पृथ्वीराजसिंह यादव, नगरसेविका कल्पना काळे आणि सौ. ज्योत्स्ना यादव यांनी मनोगत व्यक्त करून दौडीतील सहभागी तरुणांना शुभेच्छा दिल्या. दुर्गामाता दौड ही केवळ धार्मिक परंपरा नसून, तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा रुजवणारा उपक्रम आहे. अशा उपक्रमांमुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून संस्कारक्षम आणि समाजहितासाठी कार्य करणारे नागरिक बनावे, असे आवाहनही करण्यात आले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई आणि शिरोळ तालुकाध्यक्ष प्रवीण चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांपासून दुर्गामाता दौड उत्साहात सुरू आहे. तरुणांचा वाढता सहभाग आणि नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद यामुळे शिरोळमध्ये भक्ती, शक्ती आणि राष्ट्रभक्तीचा जागर अधिक प्रभावीपणे होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!