पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी येथील मनुग्राफ कंपनीसमोर दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला आहे. दुचाकीने मागून टेम्पो ट्रकला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास जखमी गणेश वसंत पाटील ( रा टोप ता हातकणंगले ) हा तरुण कामावरून टोप येथे घरी जात असताना शिरोली एमआयडीसीमधील मनूग्राफ कंपनीसमोर आल्यावर त्याची दुचाकी अचानक समोर चाललेल्या टेम्पो ट्रकला मागून जाऊन धडकली. या अपघातात दुचाकीस्वार गणेश याच्या डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
या अपघातानंतर काही वेळ पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.