हेरवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथील एकूण ९ अंगणवाड्यांचा संयुक्त ‘प्रवेशोत्सव व वेलकम समारंभ’ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
‘अंगणवाडीतील माझे पहिले पाऊल’अंतर्गत चिमुकल्यांच्या शारीरिक आणि बालस्नेही विकासासाठी विशेष उपक्रम, खेळातून शिक्षणाची नवी दिशा, विविध कौशल्यांवर आधारीत खेळांची आखणी,विविध गमतीदार खेळांची रचना करण्यात आली होती. मुलांचे सहर्ष स्वागत करून त्यांच्यासाठी शारीरिक संतुलनावर आधारित खेळ आयोजित केले होते.
पूर्वप्राथमिक शिक्षण हा बालकांच्या शिक्षणाचा पाया असून, अंगणवाड्यांना प्राथमिक शाळांशी जोडणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीतच करावा, असे आवाहन यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिरोळच्या गटशिक्षण अधिकारी सौ. भारती कोळी यांनी,लहान वयातच बालकांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी योग्य वातावरण मिळणे गरजेचे असून शिक्षकांनी व पालकांनी बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा,असे सांगितले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या तथा जि. प. शिक्षण समितीच्या सदस्या सौ. उत्तरादेवी शिंदे होत्या.त्यांनी जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमधून मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा पालकांनी लाभ घ्यावा,असे नमूद केले.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब वनकोरे,विजीतसिंह शिंदे सरकार,सरपंच साहेबराव साबळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका शाहीन पठाण,केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे, मुख्याध्यापक हिंदूराव फासके, दत्तात्रय कमते,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयसिंग वडर यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस,पालक,ग्रामस्थ आणि चिमुकले बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्याने दाखल झालेल्या बालकांचे गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन औक्षण करत उत्साहात स्वागत करण्यात आले.