दत्तवाड केंद्रस्तरीय पहिली शिक्षण परिषद टाकळीवाडीत उत्साहात संपन्न

Spread the love

हेरवाड / प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील बदलते विविध प्रवाह, नवीन शैक्षणिक संकल्पना आणि विचारांचे आदान-प्रदान करण्याच्या उद्देशाने जुलै २०२६ ची दत्तवाड केंद्रांतर्गत शाळांची पहिली शिक्षण परिषद सैनिक वेलफेअर असोसिएशन टाकळीवाडी येथील हॉलमध्ये उत्साहात पार पडली.​

पहिल्या सत्रात केंद्रातील विविध शाळांच्या लक्षणीय बाबी व समस्यांचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाचे पुनरावलोकन करून केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात मागील महिन्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शिक्षकांनी वर्गात अध्यापन करताना येणाऱ्या प्रत्यक्ष समस्यांवर एकत्रित उपायांचा शोध घेणे आणि वर्गातील अनुभवांची देवाणघेवाण या विषयावर मार्गदर्शक गुंडा गोपाळ परीट यांनी मार्गदर्शन केले.  ​

तिसऱ्या सत्रात अमोल पुजारी यांनी ऑगस्ट महिन्यासाठी वर्गाचे नियोजन, अध्ययन निष्पत्तींची निवड,आशयाची स्पष्ट व सोपी मांडणी तसेच गटकार्याचे नियोजन कसे करावे, याविषयी माहिती दिली.

चौथ्या व अंतिम सत्रात केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे यांनी शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना व तिचे कामकाज, तसेच ‘मित्र’ उपक्रमांतर्गत ‘आनापान साधना’ या विषयावर शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

या शिक्षण परिषदेचे नेटके व नियोजनबद्ध संयोजन मुख्याध्यापक रवींद्र सिदनाळे,गणपती एकसंबे, सुनील खेमाणे,यशवंत हलकर,दीपक पाटील,नंदकुमार मोटे,सरिता बंडगर आणि मनीषा काळेल यांनी केले. यावेळी दत्तवाड केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!