राजकारणापलीकडची मैत्री ठरली चर्चेचा विषय,मैत्रीदिनानिमित्त माजी सरपंच गजानन संकपाळ यांच्या स्टेटसने वेधले शिरोळकरांचे लक्ष

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

“दोस्ताना है हमारा, रहेगा हमेशा हमारा…” या भावनिक ओळींसह माजी सरपंच गजानन संकपाळ यांनी मैत्रीदिनानिमित्त आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर जिवलग मित्र माजी ग्रामपंचायत सदस्य निळकंठ (पिंटू) फल्ले, आरोग्य सभापती विजय आरगे आणि भगवान आवळे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला.या स्टेटसची शिरोळ शहरात दिवसभर चर्चा रंगली असून,राजकीय मतभेद असले तरी मैत्रीचे नाते अधिक दृढ असते, याचा प्रत्यय या निमित्ताने नागरिकांना आला.

शिरोळच्या राजकारणात गजानन संकपाळ, विजय आरगे आणि पिंटू फल्ले हे तिघेही आपापल्या कार्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात असली, तरी वैयक्तिक नात्यांमध्ये त्यांनी जपलेली मैत्री अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मैत्रीदिनाच्या निमित्ताने संकपाळ यांनी ठेवलेल्या या स्टेटसने राजकीय चर्चांपेक्षा मैत्रीचे महत्त्व अधोरेखित केले.

सोशल मीडियावर शेअर झालेला हा फोटो आणि त्यावरील संदेश अनेकांनी कौतुकाने पाहिला. “राजकारण हे समाजकारणाचे माध्यम असले, तरी मैत्री ही त्यापलीकडची भावना आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. राजकीय मतभेद, निवडणुका आणि विविध भूमिका या सर्व गोष्टी बाजूला ठेवून जिव्हाळ्याचे संबंध कायम ठेवण्याचा संदेश या स्टेटसमधून मिळाल्याचेही नागरिकांनी सांगितले.

शिरोळच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात या तिघांची मैत्री अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. विविध सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच शहराच्या विकासाच्या प्रश्नांवरही त्यांनी अनेकदा एकत्रितपणे सहभाग नोंदविल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे मैत्रीदिनानिमित्त शेअर करण्यात आलेला हा फोटो केवळ सोशल मीडिया पोस्ट न ठरता, मैत्रीच्या नात्याचा एक भावनिक आठवण ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, येणाऱ्या काळातही ही मैत्री अशीच कायम राहावी, तिघांची जोडी ‘त्रिदेव’प्रमाणे समाजासाठी आणि शिरोळच्या विकासासाठी एकत्र कार्यरत राहावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह त्यांच्या मित्रपरिवारातून व्यक्त होत आहे. मैत्रीदिनाच्या निमित्ताने शिरोळमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या या स्टेटसने पुन्हा एकदा सिद्ध केले की, राजकारणापेक्षा मैत्रीचे बंध अधिक मजबूत आणि चिरंतन असतात.

Leave a Comment

error: Content is protected !!