पुलाची शिरोली परिसरात चोरांचा सुळसुळाट दोन दिवसांत तीन मोटारसायकलींसह घरफोडी करण्याचा प्रयत्न

Spread the love

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

नागाव, पुलाची शिरोली आणि टोप परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका ५ ते ६ जणांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे.घरांसमोर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काठीच्या साहाय्याने फोडून दारातील मोटारसायकल आणि बंद घरांना हे चोरटे टार्गेट करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

गेल्या चार दिवसांत या परिसरातून तीन मोटारसायकली चोरीला गेल्या असून, या वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी तातडीने सतर्क होऊन परिसरात गस्त (पेट्रोलिंग) वाढवण्याची तीव्र मागणी नागरिकांमधून होत आहे.

शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत पोलिसांची कारवाई (डिटेक्शन) कमी पडत असल्याचे चित्र आहे.

१५ दिवसांपूर्वी नागाव येथे एकाच वेळी तीन ठिकाणी घरफोड्या करून सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल चोरण्यात आला होता. तसेच, मागील महिन्यात औद्योगिक वसाहतीमधील महागड्या कार्बाइड इन्सर्ट टूल्सचे दुकान फोडून सुमारे कोटी रुपयांचे साहित्य लांबवण्यात आले होते. या दोन्ही मोठ्या गुन्ह्यांचा अद्याप कोणताही तपास लागलेला नाही.

पण नागाव येथील स्थानिक नागरिक व एका पोलीस अधिकाऱ्याच्याच घरात झालेल्या चोरीचा तपास लवकरात लवकर लागेल अशी मोठी आशा होती कारण संबंधित अधिकारी त्यांचाच सहकारी आहे मात्र या चोरीचा तपासही अद्याप गुलदस्त्यातच आहे कारण

पोलिसांकडून या चोरीचा तपास थंडावल्यामुळे नागाव गावातील काही तरुण मंडळींनी स्वतःच सतर्क होत संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी दोन दिवस गावात गस्त घातली.

या दरम्यान रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील एका जनावरांच्या गोठ्याचे कुलूप तोडून तेथील सीसीटीव्ही कॅमेरा काठीच्या साहाय्याने फोडण्यात आला. तेथे चोरांच्या हाती काहीच लागले नाही, मात्र त्यांनी कर्नाटकातून चोरून आणलेल्या दोन मोटारसायकली चिखलात रुतल्यामुळे त्याच ठिकाणी सोडून दिल्या आणि गावातील अन्य दोन मोटारसायकली चोरून नेल्या. व पाझर तलाव परिसरातील एकाचे घर फोडून रोख रकमेसह तांब्याच्या वस्तू लांबवण्यात आल्या. तसेच, अन्य एका व्यक्तीचे घर फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला; परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन शेतशिवारातून पळ काढला.

या सर्व घटनेची तात्काळ माहिती शिरोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, परंतु त्यांच्या हाती अद्याप कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देवून त्यांच्यावर कारवाई करून या टोळीचा बंदोबस्त करणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!