कृष्णामाईने श्री दत्तगुरूंच्या पादुकांना केला जलाभिषेक; हजारो भाविकांनी घेतला तीर्थस्नानाचा लाभ
नृसिंहवाडी / प्रतिनिधी
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या अखंड जयघोषात नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरातील चालू वर्षातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा आज शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी पहाटे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पहाटे साडेचारच्या सुमारास कृष्णा नदीचे पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून आत प्रवेश करून श्रींच्या पवित्र पादुकांवरून प्रवाहित झाले आणि दक्षिणद्वारातून बाहेर पडले.या दुर्मीळ व दैवी क्षणाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो दत्तभक्तांनी मोठी गर्दी केली होती.गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी नदीचे पाणी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचल्याने दक्षिणद्वार सोहळा कधी घडणार, याकडे भाविकांचे लक्ष लागले होते. अखेर शुक्रवारी पहाटे कृष्णामाईने श्रींच्या पादुकांना स्पर्श करत जलाभिषेक केल्याने परिसरात भक्तिभावाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.दत्त संप्रदायात दक्षिणद्वार सोहळ्याला अत्यंत पवित्र मानले जाते. वर्षातून केवळ पावसाळ्यातच कृष्णा नदीचे पाणी मंदिरात प्रवेश करून श्रींच्या पादुकांवरून प्रवाहित होत असल्याने या सोहळ्याचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. चालू वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा ७ जुलै रोजी पार पडला होता, तर शुक्रवारी भाविकांना दुसऱ्या सोहळ्याचा लाभ घेण्याची संधी मिळाली.दरम्यान, वाढत्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर श्री दत्त देवस्थान प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेत मंदिरातील साहित्य सुरक्षितस्थळी हलविले आहे. कृष्णा नदीच्या पाण्याने मंदिराला वेढा दिल्याने श्रींची उत्सवमूर्ती नारायण स्वामी मठात ठेवण्यात आली असून तेथे भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्व नित्यपूजा आणि धार्मिक विधी नारायण स्वामी मठात नियमित सुरू राहतील, अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली.धरण परिसरात पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून भाविकांनीही सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.