कोल्हापूर / प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने नोंदविण्यात आलेल्या दूध संस्थांच्या पात्रता पडताळणी प्रक्रियेत मोठा उलटफेर झाला असून तब्बल ६४१ संस्था अपात्र ठरल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सहाय्यक दुग्ध निबंधक कृष्णा ठाकरे यांनी दिलेल्या दुसऱ्या निकालानुसार नव्याने नोंद झालेल्या १३२० प्राथमिक सहकारी दूध संस्थांपैकी ६७९ संस्था पात्र, तर ६४१ संस्था अपात्र ठरल्या आहेत.या निर्णयामुळे गोकुळच्या निवडणुकीतील मतदारसंख्येवर मोठा परिणाम होणार असून गेल्या पाच वर्षांत सत्तेत असलेल्या विविध गटांना याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे तसेच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थकांकडून नव्याने नोंद झालेल्या अनेक संस्थांचा समावेश असल्याने त्यांच्या मतदानाच्या ताकदीत घट होण्याची चिन्हे आहेत.गेल्या काही महिन्यांपासून गोकुळच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नव्या दूध संस्थांच्या नोंदणीचा विषय चर्चेत होता. या संस्थांच्या पात्रतेबाबत अनेक आक्षेप व हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुग्ध विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणीत मोठ्या प्रमाणात संस्था निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचे समोर आले.दरम्यान, अपात्र ठरलेल्या संस्थांकडून पुढील कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला जाण्याची शक्यता असून अंतिम मतदार यादी जाहीर होण्यापूर्वी आणखी घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सध्याच्या निकालामुळे गोकुळच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्यास सुरुवात झाली असून आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.