कु.रावी पाटील चॅम्पियन; कु.ईश्वरी सुतार प्रथम क्रमांकाची मानकरी
हेरवाड / प्रतिनिधी
पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या मास्टर एज्युकेशन अकॅडमीच्या ११ व्या राष्ट्रीय अबॅकस व वैदिक गणित चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ मध्ये कन्या विद्या मंदिर, हेरवाडच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळा, पालक आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्लीसह विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कठीण आणि चुरशीच्या स्पर्धेत कन्या विद्या मंदिरच्या इयत्ता दुसरीतील कु.रावी राहुल पाटील हिने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर चॅम्पियनशिपचा मान पटकावला. तिच्या या यशामागे प्रशिक्षिका राधिका चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्याचप्रमाणे इयत्ता दुसरीतीलच कु.ईश्वरी दादासो सुतार हिने प्रथम क्रमांक मिळवत आपली बौद्धिक क्षमता सिद्ध केली.तिच्या यशामागे अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. अल्पवयातच राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे दोन्ही विद्यार्थिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायत आणि शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सरपंच सौ.रेखा जाधव आणि मुख्याध्यापक सुभाष तराळ यांच्या हस्ते विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी माजी सरपंच चंद्रकला पाटील, ग्रामपंचायत सदस्या विजयमाला पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका संगीता चावरे, स्मिता सुतार, कविता आलासे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रमजान नदाफ, दादासो सुतार, सुभाष देबाजे, आबा देसाई, सागर उगारे, बाबालाल बाणदार, दिलीप शिरढोणे, गुंडा परीट, ज्योती परीट, गीता ढवळे, सुनिता लठ्ठे, प्रेरणा मोरे, धनश्री होनमाने यांच्यासह पालक, शिक्षक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे हेरवाडच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून भविष्यातही अशाच प्रकारे गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हे यश प्रेरणादायी ठरणार आहे.