दत्त उद्योग समूहास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार विनय कोरे यांची सदिच्छा भेट

Spread the love

कृषी, उद्योग व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक चर्चा; ग्रामीण प्रगतीला गती देण्याचा निर्धार

शिरोळ / प्रतिनिधी 

दत्त उद्योग समूहास महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच माजी मंत्री व आमदार विनय कोरे यांनी सदिच्छा भेट देत समूहाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली.यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.या भेटीदरम्यान दत्त उद्योग समूहामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी व ग्रामीण विकासाभिमुख उपक्रमांची सविस्तर माहिती मान्यवरांना देण्यात आली. विशेषतः क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प,सेंद्रिय शेती उपक्रम, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर तसेच शाश्वत शेती विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या संकल्पनांबाबत सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास, जमिनीची सुपीकता सुधारण्यास आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी शेतकरी हित, कृषी विकास, ग्रामीण अर्थव्यवस्थेची मजबुती तसेच सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सकारात्मक व विधायक चर्चा झाली. विशेषतः साखर उद्योगासमोरील सध्याची आव्हाने, शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, कृषी क्षेत्रातील नव्या संधी आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले.मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दत्त उद्योग समूहाच्या कृषी व ग्रामीण विकासासाठीच्या कार्याचे कौतुक करत अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे शेतकरी आणि ग्रामीण समाजाला मोठा लाभ होत असल्याचे सांगितले. तर आमदार विनय कोरे यांनी शेती, उद्योग आणि सहकार यांचा प्रभावी समन्वय साधल्यास ग्रामीण विकासाला अधिक गती मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला.या प्रसंगी शेती, उद्योग आणि सहकार या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय साधून ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मान्यवरांच्या भेटीमुळे दत्त उद्योग समूहाच्या विविध विकासात्मक उपक्रमांना नवी ऊर्जा, प्रेरणा आणि बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम हे ग्रामीण विकास, शेतकरी सक्षमीकरण आणि शाश्वत कृषी व्यवस्थेकडे वाटचाल करणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, अशा उपक्रमांना लोकप्रतिनिधींचे मिळणारे सहकार्य भविष्यात अधिक सकारात्मक बदल घडवून आणण्यास उपयुक्त ठरणार आहे.यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव,समित कदम, कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!