कासारवाडीत जागेच्या वादातून दोन गटांत हाणामारी ; परस्परविरोधी तक्रारी दाखल

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे जागेच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या मारहाणीप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांतील एकूण १८ जणांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले असून पहिल्या फिर्यादीत प्रविण नामदेव खोत (वय ४१, रा. कासारवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या वाटणीस आलेल्या जागेत गारीसाठी खड्डा काढत असताना आरोपींनी विरोध केला. यावेळी शिला बाजीराव खोत व रंजना खोत यांनी लोखंडी पाईपने फिर्यादी, त्यांची पत्नी प्राजक्ता, मुलगा समरजित व मुलगी केतकी यांना मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच इतर आरोपींनी एकत्र जमाव करून लाथाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी शिला खोत, रंजना खोत, जयश्री खोत, सीमा खोत, इंदुबाई खोत, सुनिता खोत, संभाजी खोत, शिवाजी खोत, ओमकार खोत, रतन खोत, शहाजी खोत, तानाजी खोत, शोभा खोत व सरदार खोत यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, दुसऱ्या गटाकडूनही प्रतितक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाजी बापू खोत (वय ६९, रा. कासारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत, गट नं. २८५ मधील वाटणी झालेल्या शेतजमिनीत घरासमोर गारीसाठी खड्डा काढण्यावरून वाद झाल्याचे म्हटले आहे. या वादातून धनाजी हिरवे, प्राजक्ता प्रविण खोत, प्रविण नामदेव खोत व आश्लेषा धनाजी हिरवे यांनी फिर्यादी, त्यांची पत्नी रंजना, सुन शिला, भावजय इंदुबाई व नातू ओंकार यांना लोखंडी गज, लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हाताला चावा घेऊन शिवीगाळ व धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही तक्रारींचा पुढील तपास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार महाले करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!