तालुकास्तरीय समितीकडून पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या विकासकामांची पाहणी

Spread the love

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय मूल्यांकन समितीने पुलाची शिरोली ग्रामपंचायतीला भेट देत विविध विकासकामांची सविस्तर पाहणी केली. ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रत्यक्ष तपासणी करून कामांचा दर्जा, अंमलबजावणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा समितीने घेतला.रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनील खरात यांच्या नेतृत्वाखाली ही समिती पुलाची शिरोली येथे दाखल झाली होती. ग्रामपंचायतीने गावात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती समितीसमोर सादर करण्यात आली. यामध्ये पाणंद रस्त्यांची कामे, अंगणवाडी केंद्रांची सुविधा, शाळांची स्थिती, घरकुल योजना, प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा, वृक्षारोपण उपक्रम, स्मशानभूमी शेडची उभारणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच ग्रामसुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी करण्यात आली.समिती सदस्यांनी गावातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत कामांची माहिती जाणून घेतली. ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न समाधानकारक असल्याची भावना समिती सदस्यांनी व्यक्त केली. विशेषतः स्वच्छता, पाणी व्यवस्थापन आणि ग्रामसुरक्षा यासंदर्भातील उपक्रमांकडे समितीचे लक्ष वेधले गेले.या मूल्यांकन समितीमध्ये खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शरद भांड, समीर वारे, दिनेश शिगवण, सागर पवार आणि प्रणील लोखंडे यांचा समावेश होता. त्यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत ग्रामपंचायत प्रशासनाशी चर्चा केली.यावेळी हातकणंगले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए. एस. कठारे, पंचायत समिती सदस्या सौ. कमल कौदाडे, उपसरपंच विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्या सौ. मनिषा संकपाळ, महादेव सुतार, आरिफ सजेंखान, महमद महात यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत अधिकारी सौ. गीता कोळी यांनी ग्रामपंचायतीच्या विविध योजनांची माहिती देत प्रास्ताविक केले. तर उपस्थितांचे आभार उपसरपंच विजय जाधव यांनी मानले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!