पुलाची शिरोली / प्रतिनिधी
पुणे-बंगळुरू महामार्गावर सांगली फाटा उड्डाणपुलाजवळ गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता झालेल्या अपघातामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा झाला. कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला त्याच दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभरासाठी ठप्प झाली.अपघाताची तीव्रता एवढी होती की वाहने महामार्गावर अडकून पडली. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी मार्ग बदलून सांगली फाटा मार्गे सर्विस रोडवरून कोल्हापूरकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच दरम्यान कोल्हापूरहून सांगलीकडे येणारी वाहने आणि सांगली फाट्याच्या दिशेने जाणारी वाहने समोरासमोर आल्याने सेवा रस्ताही पूर्णपणे ब्लॉक झाला. परिणामी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहनधारक हवालदिल झाले.गेल्या आठवड्यात देखील याच परिसरात अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. वारंवार होणारे अपघात, वाहतूक कोंडी आणि महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. महामार्गावरील कामांचे निकृष्ट नियोजन आणि दिरंगाई यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे.या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पोलीस प्रशासनाला अधिक मेहनत घ्यावी लागत असून त्यांच्यावरही ताण येत आहे. उड्डाणपुलावरील अपघात जरी एकाच वाहनाच्या चुकामुळे झाला असला तरी परिणामी संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली.वाहतूक कोंडीची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.