पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानांतर्गत शिरोली हायस्कूल येथे बीएलओ यांच्याशी आढावा बैठक पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी सर्व बीएलओंना कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी शबाना मोकाशी म्हणाल्या कि मतदार यादी हा लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. त्यामुळे नवीन पात्र मतदारांची नोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि तपशीलातील दुरुस्त्या ही कामे अत्यंत जबाबदारीने आणि अचूकपणे करावीत. एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी तसेच, प्रत्येक बीएलओने आपल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधावा आणि प्रक्रिया गतीमान करावी, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामविकास अधिकारी गीता कोळी यांनी, मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी ग्रामपंचायत स्तरावरून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. ग्रामपंचायत प्रशासन आणि बीएलओ यांच्यातील योग्य समन्वयामुळे हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे, उपसरपंच विजय जाधव, बाजीराव पाटील, महंमद महात, योगेश खवरे, हिदायतुला पटेल यांच्यासह शिरोली हायस्कूलचे शिक्षक, पालक आणि सर्व बीएलओ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी, एसआरआर अभियान यशस्वी करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार उपस्थितीतून व्यक्त करण्यात आला.