शिरोळ शहर हॉटेल असोसिएशनची कार्यकारिणी बिनविरोध; मनोहर फल्ले अध्यक्षपदी

Spread the love

हॉटेल व्यावसायिकांच्या प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा नूतन पदाधिकाऱ्यांचा निर्धार

शिरोळ / संदीप इंगळे

शिरोळ शहर हॉटेल असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी मनोहर बंडोबा फल्ले, उपाध्यक्षपदी डी. आर. कोळी (दाजी), सचिवपदी नितीन कोळी आणि खजिनदारपदी संदीप महाडिक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे उपस्थित हॉटेल व्यावसायिकांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

बैठकीत संघटनेच्या माध्यमातून शिरोळ शहरातील हॉटेल व्यवसाय अधिक सक्षम, संघटित आणि प्रगत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.हॉटेल व्यावसायिकांसमोर असलेल्या विविध अडचणी,शासकीय नियमांशी संबंधित प्रश्न,व्यवसायातील बदलते आव्हान तसेच ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर बंडोबा फल्ले (श्री लकी रेस्टॉरंट) यांनी हॉटेल व्यावसायिकांचे हित जपणे, त्यांच्या अडीअडचणी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि सर्व सदस्यांना सोबत घेऊन संघटनेचे कार्य अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष डी.आर.कोळी (दाजी), सचिव नितीन कोळी (न्यू भारत कॅफे) आणि खजिनदार संदीप महाडिक (हॉटेल दर्शन) यांनीही संघटनेच्या माध्यमातून व्यवसायिकांना सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

या बैठकीला बबन पुजारी, अजित गावडे, संजय जगदाळे, किशोर महात्मे, गजानन कुंभार, विजय मुडशिंगे, दामू भजनावळे, मोहन फल्ले, सुधाकर फल्ले, सुशांत काळे, शाहरुख खलिफ, नंदू खोत यांच्यासह शिरोळ शहरातील हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नूतन कार्यकारिणीवर विश्वास व्यक्त करत संघटनेच्या माध्यमातून व्यवसायिकांच्या न्याय्य प्रश्नांना प्राधान्य मिळेल आणि हॉटेल व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य केले जाईल,अशी अपेक्षा व्यक्त केली. बिनविरोध झालेल्या या निवडीमुळे शिरोळ शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून संघटनेच्या आगामी कार्याबाबत आशावाद व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!