ग्रामपंचायतीने कर वसुलीत सर्वांना समान न्याय द्यावा; सिंबॉलिक इंटरनॅशनल स्कूल प्रकरणी गावकऱ्यांचा सवाल

Spread the love

ग्रामपंचायतीने कर वसुलीत सर्वांना समान न्याय द्यावा; सिंबॉलिक इंटरनॅशनल स्कूल प्रकरणी गावकऱ्यांचा सवाल

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत कराची थकबाकी असलेल्या अनेक मालमत्ताधारकांवर यापूर्वी वसुलीची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, सिंबॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या इमारत व ग्राऊंडच्या ग्रामपंचायत कराबाबत अद्याप अंतिम कारवाई झालेली नसल्याने गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

या प्रकरणात संबंधित जागेची शासकीय मोजणी होऊन अहवाल सादर करण्यात आला आहे. तसेच तालुका विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांची बैठक घेण्यात आली होती. पुढील बैठक बिरदेव यात्रा व उरूसानंतर घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते; मात्र आजपर्यंत ती बैठक झालेली नाही.

यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत संबंधित मालमत्तेवर ग्रामपंचायत कर आकारणी करण्याबाबत ठराव मंजूर झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि. २१ सप्टेंबर २०१६ च्या आदेशानुसार आणि त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच गट विकास अधिकारी, हातकणंगले यांनी ग्रामपंचायतीला आवश्यक कार्यवाहीबाबत लेखी पत्रव्यवहार केलेला असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडे दोन स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली असून, त्यामध्ये एकसमान निकषाने कर वसुलीची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी ज्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे सिंबॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या संबंधित मालमत्तेबाबतही कायद्यानुसार निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत. त्यामुळे कोणताही भेदभाव किंवा दुजाभाव न करता सर्व थकबाकीदारांवर समान निकष लागू करून पारदर्शक पद्धतीने निर्णय घ्यावा, तसेच या प्रकरणातील सद्यस्थिती आणि कार्यवाहीची माहिती ग्रामस्थांसमोर जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, ज्या प्रकरणांमध्ये ग्रामपंचायतीने यापूर्वी कर न भरल्यामुळे कारवाई केली, त्याच निकषांवर सिंबॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या संबंधित मालमत्तेबाबत कारवाई नेमकी केव्हा होणार? याचे स्पष्ट उत्तर ग्रामपंचायतीने देऊन कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित रामचंद्र बुडकर, प्रशांत कागले सचिन कागले, जनार्दन कौदाडे, ओमकार कौदाडे, सुनील पाटील, धनाजी पाटील, सदाशिव संकपाळ, जयराज अनुसे, ऋषिकेश सरनोबत, संभाजी गायकवाड, अक्षय यादव, संतोष पवार, हर्ष यादव, योगेश नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!