श्री गणेश सहकारी पाणीपुरवठा मंडळीची ५९ वी सभा वादळी; संचालक मंडळाच्या कारभारावर सभासदांचा संताप 

Spread the love

गणेशवाडी / प्रतिनिधी 

 

श्री गणेश सहकारी पाणीपुरवठा मंडळी गणेशवाडी संस्थेची ५९ वी सर्वसाधारण सभा रविवारी वादळी ठरली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही सभा तब्बल तीन तास वादाच्या भोवऱ्यात अडकून दुपारी ३ वाजता संपली.सभेदरम्यान सभासदांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर चेअरमन व संचालक मंडळाने समाधानकारक उत्तर न दिल्याने सभासदांचा रोष वाढला त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.

सभेच्या सुरुवातीलाच मागील वर्षी २०२३-२४ मध्ये झालेल्या भागभांडवल वाढीच्या ठरावाची यंदा सभेत दखल न घेतल्याने सभासदांनी तीव्र संताप व्यक्त केला.पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामातील दिरंगाई, चेअरमन व संचालक मंडळाचा मनमानी कारभार, नवीन सभासद करताना दूजाभाव,पाणीपट्टी आकारणी आदी मुद्द्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.सभासद मल्लाप्पा अंकलखोपे, शिवाजी कोळेकर, रुषभ माणकापुरे यांनी संस्थेतील अपारदर्शक कारभारावर सवाल उपस्थित करत “संचालक मंडळ हुकूमशाही पद्धतीने काम करत असून सभासदांना कोणतीही माहिती दिली जात नाही,” असा आरोप करत त्यांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची ठाम मागणी करत आक्रमक पवित्रा घेतल्याने काही वेळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र, शेवटी संचालक मंडळाने सभासदांच्या मागण्यांची दखल घेत उपस्थित केलेल्या भागभांडवल वाढीच्या विषयावर १ महिन्यांनी पुन्हा सभा घेऊन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्यामुळे सभासद शांत झाले.यानंतरच सभा आटोपली. 

यासभेत संस्थेच्या भविष्यातील योजनांबाबत ठोस निर्णय होणे अपेक्षित होते,मात्र वादामुळे अनेक मुद्दे प्रलंबितच राहिले.त्यामुळं भविष्यात संस्थेच्या कारभारावर प्रशासक येणार का,याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!