“साहेबांचा वाढदिवस ८ सप्टेंबर रोजी झाला असेल,तर कृपया डिजिटल बोर्ड काढून घ्या” व्यापाऱ्याची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

 

जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या ८ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर डिजिटल फलक लावण्यात आले होते.या फलकांसाठी संबंधित ग्रामपंचायती आणि नगरपालिका यांची परवानगीही घेण्यात आली होती.मात्र,वाढदिवस होऊन तब्बल बारा दिवस उलटूनही अनेक फलक अजूनही तसेच लागून राहिले आहेत.या डिजिटल फलकांमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून,अनेक ठिकाणी व्यवसायिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.याच पार्श्वभूमीवर एका स्थानिक व्यापाऱ्याने “साहेबांचा वाढदिवस ८ सप्टेंबर रोजी झाला असेल,तर कृपया डिजिटल बोर्ड काढून घ्यावेत” अशी पोस्ट ‘नगरपालिका समस्या’ या सोशल मीडिया ग्रुपवर केली.ही पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली असून, शिरोळ तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.या प्रकारामुळे सामान्य नागरिक आणि वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राजकीय रोष आपल्यावर येऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने वाढदिवसानंतर तातडीने फलक काढण्याची कारवाई न केल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.सार्वजनिक ठिकाणी असणारे हे मोठ्या आकाराचे फलक केवळ सौंदर्यावर परिणाम करत नाहीत,तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोकादायक ठरू शकतात,असे मत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.या प्रकरणी नगरपरिषद किंवा संबंधित कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर हे फलक हटवावेत,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, यापुढे अशा प्रकारच्या फलकांबाबत एक ठोस नियमावली तयार करून अमलात आणण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!