शेडशाळ / प्रतिनिधी
शेडशाळ-गणेशवाडी मार्गावर अर्जुन देशिंगे यांच्या घराजवळ ऊस वाहतूक करणारी ट्रॉली पलटी झाल्याने मोठा गोंधळ उडाल्याची घटना आज बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान या मार्गावर कोणतेही इतर वाहन नसल्याने सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, ऊस वाहतुक करणारा ट्रॅक्टर कर्नाटक राज्यातील शेडबाळ येथील नाईक यांचा असून हुपरी येथील जवाहर साखर कारखान्यांकडे ऊस घेऊन जात होता.अर्जुन देशिंगे यांच्या ऊस रोपवाटीके जवळ येताच दोन नंबरच्या ट्रॉलीची पिन निघाली.त्यामुळे ट्रॉली नियंत्रणाबाहेर जाऊन विद्युत खांबावर आणि देशींगे यांच्या ऊसरोपवाटीकेवर पलटी झाली.या अपघातात विद्युत तारा तुटून रोपवाटीकेचे ही मोठे नुकसान झाले.घटनास्थळी त्वरित पोहोचलेल्या लोकांनी आणि स्थानिक प्रशासनाने मदत केली,पण सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही शारीरिक इजा झाली नाही.मात्र, देशींगे यांच्या ऊस रोपवाटीकेचे नुकसान आणि तुटलेली विद्युत तारा यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सदर अपघात ट्रॉलीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घटनास्थळी शेतकरी अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.