सुसंस्कारित विचाराचा वास्तुपाठ- स्व.ह.भ.प.शामराव उर्फ नारायण काळे (नाना)

पांढरी बंडी,पांढरे धोतर अन गडद तपकिरी बदामी रंगाची करकरीत मखमली टोपी आणि कपाळी गंध. एका हाताला धोतराचे टोक आणि दुसऱ्या हाताला आयुष्यभर सायकल अन सरतेशेवटी आधाराला काठी.सायकलबरोबर चालत येणारे नाना अगदी मैलांवरुन पण ओळखुन यायचे,पण त्यांच्या आधी त्यांनी दिलेली रांगडी हाक पोहोचायची.आख्या गावात नानांनी हाक मारली नाही अशी एकही व्यक्ती नसेल! नानांच्या आधी जन्मलेली मोठी माणसं ते अगदी नानांच्या शेवटच्या दिवसांपर्यत जन्मलेली बाळे, सगळ्यांना तेवढ्याच आपलेपणाने हाळी मारायचे आमचे नाना.ऋतु कोणताही असो नानांच्या दिवसाची सुरवात हातात झाडू घेऊन व्हायची.पहाटे पहाटे अंगण झाडायचे आणि नंतर थंडगार पाण्याने आंघोळ करायची.स्वतःचे धोतर स्वतःधुवायचे.त्यानंतर देवपुजा करायची,अंगाला गंध लावायचा,वारकरी सांप्रदायाचे सगळे सोपस्कार करायचे अन सायकलीवर टांग टाकून शेताकडे सकाळच्या धारेला रवाना व्हायचे.शेतात मुलांच्या बरोबरीने राबायचे, दुपारचे जेवण करुन परत शेतातील कामे उरकायची.संध्याकाळी घरी येऊन चहा झाला की,लगेच घरातील स्त्रीयांना (बायकोसोबत सूनांनासद्धा) मदत करायची.शेंगा फोडायच्या, भाज्या निवडायच्या,लसूण सोलायचा अशी कितीतरी कामे घरी करायची.नंतर जेवणामधे दुध,भात,भाकरी हे ताटातील प्रमुख पदार्थ.जे ताटात येईल ते खायचे,कधी अन्नावरुन चिडचिड केली नाही किंवा कोणती मागणी ठेवली नाही. त्यांना फळे खायला आवडायची आणि कधी कधी चहासोबत खारी बटर खायचे,एवढीच काय ती चैन त्यांनी केली असेल.जेवण करायचे अन शांत झोपी जायचे.बरं एवढं करुन आठवड्याचा बाजार पण तेच करायचे.हा त्यांचा दिनक्रम त्यांच्या आयुष्यात बरीच वर्ष चालला. लहानपणापासून जबाबदारी अंगावर पडली, घरच्यांसाठी अन नातलगांसाठी जे काही करता येईल ते पुढे होऊन केले.शालेय शिक्षण फारसे झाले नसल्याने त्यांच्यासाठी शेती हा कौटुंबिक चरितार्थ चालवण्याचा एकमेव मार्ग होता अन ते त्यांनी आयुष्यभर ईश्वरसेवेसारखे ईमाने इतबारे केले. तरुणपणीच काही अडचणींमुळे त्यांना अंगावरचे सोने,शेतीतील काही भाग विकावा लागला पण आपल्या लोकांसाठीच म्हणून तेही त्यांनी हृदयावर दगड ठेवून केले.खरे पण आयुष्यभर याची सल त्यांच्या मनात राहिली. जे शेतकरी आहेत त्यांना समजेल हे दुःख काय असते ते. कालांतराने मुले मोठी होऊन स्वावलंबी झाल्यावर त्यांनी नानांच्या मदतीने ती शेतजमीन परत मिळवली.यालाच जिद्द म्हणतात.घर-गृहस्थीपण नानांनी खंबिरपणे पेलली.यामध्ये त्यांना बनुआईची मोलाची साथ लाभली.बनुआई नानांचा जवळपास ८० वर्षांचा संसार.आयुष्यभर दोघांनी कष्ट करुन सगळ्यांना सांभाळले, शिकवले, योग्य वयात सगळ्यांचे संस्कार व सोपस्कार पार पाडले.नाना शेती करून धान्य पिकवायचे तर आई पहाटे पहाटे ते धान्य जात्यावर दळून मग त्याच्या भाकरी करून सगळ्यांना वाढायची.दोघेही घरचं बघत बघत मुलांना लेकींना सांभाळायचे. त्यांना एकूण ८ मुलं. ५ मुले आणि ३ मुली. त्यातील एक लेक त्यांनी खूप लवकर गमावली. याचं दुःख त्यांनी कसे पचवले ते देवालाच माहीत.आई – नानांनी स्वतः कितीही त्रास सोसला तरी तो त्रास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार नाही याची कायम पुरेपूर काळजी घेतली.सुनांना स्वतःच्या लेकींप्रमाणेच मानले. जाच तर लांबच पण उलट लागेल तिथं सुनांच्या बाजुने ते दोघेही उभे राहिले, लढले.मुलांना चांगले शिक्षण, चांगले संस्कार दिले.आज नानांची पाचही कर्तबगार मुले शेती, व्यापार,राजकीय, सामाजिक आणि नोकरीमध्ये चांगले काम करत आहेत.हे सर्व आई नानांनी अशिक्षित असून सुशिक्षित विचाराने केलं हे देखील दाखवते. एवढ्या अडचणीं येऊनपण कधी त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा नसायची.कधी कधी चिडचिड व्हायची पण परत सगळे मागे सारून चेहरा कायम प्रसन्न अन हसतमुख ठेवायचे. नातवंड – परतुंडांवर पण नानांचे विशेष प्रेम होते.त्यांना खूप जास्त गोंधळ, दंगा केलेला आवडायचा नाही. जास्त झाले की ते त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये ओरडायचे ज्याच्या आम्हा नातवंडांमधे अजून गोड (होय,गोडच ) आठवणी आहेत.पण शेवटी आजोबाच ते त्यांच्यापेक्षा अजून जास्त प्रेम कोण करणार ! शनिवारच्या बाजारातुन नातवंडांसाठी कायम गरम गरम चिरमुरे, शेंगदाणे अन फरसाण घेऊन यायचे. आषाढी वारीहून परत येताना पंढरपुरवरुन न चुकता नातवंडांसाठी आणि परतवंडांसाठी भरपुर खेळणी आणायचे. नातवंड दुसऱ्या गावी असतील तर ती कितीही मोठी झाली तरी त्यांच्याकडे जाताना हमखास खाऊ घेऊन जायचे. मला आठवते नाना जी द्राक्ष घेऊन यायचे त्यांची चव अजुन लक्षात आहे. का कुणास ठाऊक तशी चव आत्ताच्या द्राक्ष्यांना लागत नाही, याचे कारण त्यांनी निवडलेली द्राक्षाची जात असेल किंवा त्यांचे प्रेम असेल किंवा दोन्हीही.नातवंडांनी काही मागितले की एक हात लगेच बंडीच्या खिशात जायचा.अगदी शेवटपर्यंत नाना जमेल तसा जमेल तेंव्हा नातवंडांशी संवाद साधत होते.अगदी लहान-मोठे असा कोणताही आडपडदा न ठेवता.खरंच नानांकडून किती शिकण्यासारखं आहे.आम्ही नातवंड खूपच नशिबवान आहोत ज्यांना नानांचा सहवास लाभला.नाना जितके काळे कुटुंबाचे होते तितकेच ते शिरोळ गावाचे नाना होते.आख्ख्या शिरोळ गावात कुणाच्या घरी लग्न जुळवायचे असेल वा जुळलेल्या लग्नात काही तक्रार असेल.कुठले भांडण मिटवायचे असेल वा कुणाला मनवायचे असेल,तुटणारे घर आणि तुटणारी नाती सगळे जोडण्यासाठी शिरोळ गावाचे हक्काचे अन खात्रीलायक उत्तर म्हणजे आमचे नाना असायचे. कोणाच्याही घरचे सुखद कार्य असेल वा कार्य असेल, त्यांच्याशिवाय कधी ते कार्यक्रम सुरुही झाले नाहीत अन नानांनी कधी ते चुकवलेही नाही. भल्याभल्यांना न सुटणारे कौटुंबिक प्रश्न नाना सोडवायचे म्हणूनच सगळ्यांना ते हवे हवे वाटायचे. कदाचित काळाच्या पुढचा ते विचार करायचे म्हणून त्यांना ते जमायचे. आश्चर्य म्हणजे लिहायला, वाचायला न येणारे नाना सगळीकडे एस.टी.ने एकटे फिरायचे. अन लग्नासाठी पालकांच्याआधी स्वतःस्थळाची सगळी माहिती घेऊन यायचे. लागणारी सगळी माहिती डोक्यात साठवून अन लागणारे सगळे फोन नंबर डायरीत लिहुन आणायचे. कोणाचा नंबर कुठे लिहिला आहे ते बोट ठेऊन अचूक दाखवायचे! नानांनी स्वतःच्या घरच्यांसाठी करताना गावासाठीपण एवढे केले म्हणून शिरोळमधे नाना म्हटले की समजायचे ते शामानानांच उद्देशून आहे.असे होते सगळ्या शिरोळ गावाचे नाना.
मध्यंतरी एकदा आख्खी भिंत नानांच्या अंगावर पडली त्यातून ते सुखरुप वाचले.एकदा आतड्याची मोठी शस्त्रक्रिया झाली त्यालापण नाना धाडसाने सामोरे गेले. नंतर परत एकदा सायकलवरुन शेताकडे जाताना काट्यांमध्ये खड्यात पडले.त्यातूनही ते ईश्वरकृपेने बाहेर पडले. नानांना अर्धांगवायूचा झटका आला.पण कुणालाही त्रास द्यायचा नाही या जबरदस्त ईच्छाशक्तीने त्यांनी त्यावरही चक्क मात केली. शेवटपर्यंत स्वतःची सगळी कामे ते स्वतः करायचे. आयुष्यभराचे कष्ट अन वाढत जाणारे वय यामुळे त्यांचे काही आंतरिक अवयव कमजोर झाले होते, पण त्यालासुदधा त्यांनी दिलेला लढा पाहून डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकीत व्हायचे. ९५ वर्षे झाली तरी नानांना कधी चष्म्याची गरज लागली नाही.शेवटपर्यंत बुद्धी तल्लख होती आणि स्वावलंबनाचा आग्रह होता. एखादी व्यक्ती एवढं कसं करु शकते हे मला न उलगडलेलं कोडं आहे. कदाचित याचे उत्तर त्या पिढीमध्येच दडलेलं असेल.
या सगळ्यासोबतच वारकरी असलेले नाना दरवर्षी चालत आषाढी वारी करायचे.प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला भेटून यायचे. नानांनी आळंदी ते पंढरपूर तब्बल ३८ वर्षे पायी वारी केली आणि पंढरपूर ते आळंदी पण ८ वेळा वारी केली. वारीतूनही त्यांनी बरीच माणसे जोडली. त्यातील बरीचशी माणसं घरच्यांना नाना गेल्यावर माहिती झाली, जेव्हा ती सगळी आपण होऊन नानांसाठी घर शोधत आली. पुरुष मंडळी तेव्हढीच अन महिला वर्गही तेव्हढेच. सगळ्यांना त्यांनी स्वतःच्या मुलांप्रमाने माया लावलेली. काळे कुटुंबाकडुन आषाढी वारीमध्ये गेली २५ वर्षे जेवणाची पंगत धर्मपुरी, जिल्हा सोलापूर येथे सुरु आहे. नानांच्या पश्चात यावर्षीही जेवणाची पंगत झाली.वारीमध्ये सर्वांना नानांची आवर्जून आठवण येत होती आणि सर्वांचे डोळे पाण्याने भरुन आले होते. सर्वजण आगतीने नानांच्या बद्दल चौकशी करत होते.. यावर्षीच्या वारीला नाना नव्हते आणि इथून पुढच्या वारींना पण नसणार म्हणून. तशी तर रोजच नानांची आठवण येते पण वारी सुरु झाल्यापासून डोळ्यातलं पाणी थांबतच नाहीये..पालखी, जेवण, नानांचं मित्रमंडळ सगळं सगळं आठवत आहे.जेवणाच्यावेळी भेटायला आलेला आपला गोतावळा बघून त्यांना झालेला आनंद, खुललेला चेहरा तसाच आठवतो आहे. माऊली माऊली माऊली आता आपले आपणच मनात राहायचे आहे. अजुन भरपुर बोलायचे आहे पण आता सहृदय आश्रु नयनांनी फक्त आठवायचे, जीवनाचा अपरिचित मार्ग चालताना नानांना प्रेरणास्थानी ठेवायचे! प्रथम स्मृती दिनानिमित्त नानांना भावपूर्ण आदरांजली !
तृप्ती पंडित काळे (पाटणकर) इस्लामपूर,
मो.नं. ९९२२७७२३२०
Spread the love
error: Content is protected !!