शिरोळ / प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणूक काळात कोणत्याही उमेदवाराची बातमी अथवा जाहिरात करताना जिल्हातील निवडणूक मीडिया कमिटीकडून कशाप्रकारे बातम्या जाहिरात प्रसिद्ध करावी याची माहिती घ्यावी खोटी,जातीय तेढ, अपप्रचार करणारी बातमी प्रसिद्ध होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन शिरोळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी शिरोळ तहसील कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीत केले.पत्रकार बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदिप उबाळे,तहसिलदार अनिलकुमार हेळकर,पोलीस निरिक्षक शिवाजी गायकवाड,गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्यासह अधिकारी प्रमुख उपस्थित होते.शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिरोळ तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी वृत्तपत्र व मीडिया यांची पत्रकार बैठक आयोजीत केली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे पुढे म्हणाल्या शिरोळ विधानसभा निवडणूक काळात निवडणूक आयोगाच्या नियमानुसार व आचारसंहीतेचे काटेकोरपणे पालन करून बातमी व जाहिरात प्रसिद्ध करावी जेणे करून आचारसंहीतेचे उल्लंघन होणार नाही तसेच कोणताही उमेदवारांचे प्रचार अथवा अपप्रचार होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन निवडणूक आयोग व प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असल्याचे सांगितले.
शिरोळ विधानसभेसाठी एकुण मतदान 3 लाख 25 हजार 984, मतदार असून यापैकी पुरुष मतदार – 1 लाख 61 हजार 869,महिला मतदार -1 लाख 64 हजार 113,तृतिय पंथी 2 असे मतदार आहेत विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकुण 307 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दिनांक 23 सप्टेंबर 2024 पासून सुरुवात होणार आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)अर्ज पडताळणीची तारीख – 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2024(सोमवार),बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.मतमोजणी शनिवार 23 नोव्हेंबर 2024 होणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग व शिरोळ तहसील कार्यालय यांच्या मार्फत निवडणूक कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.सदरची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.