संतप्त महिलांचा पाण्यासाठी शिरोळ पालिकेवर घागर मोर्चा

शिरोळमधील पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा पुन्हा आंदोलन : धनाजी चुडमुंगे
दोन दिवसात एक दिवस आड पाणीपुरवठा :  मुख्याधिकारी प्रचंडराव
शिरोळ / प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून शिरोळ शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.आठ आठ दिवस पाणीच येत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशी परिस्थिती उदभवली आहे.तसेच पुढचे चार महिने शहरात मुबलक पाणी मिळावे याकरिता शिरोळ नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला तर दोन दिवसात शहरात एक दिवस आड नियमित पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.शहरात मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी नागरिकांच्यावतीने गुरुवारी येथील शिवाजी चौकातून शिरोळ पालिकेवर आज गुरूवारी घागर मोर्चा काढण्यात आला.आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले की यावर्षी पाऊस कमी पडल्याने कोयना धरण 100% भरले नव्हते.त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईला समोरे जावे लागणार आहे.शिरोळ गावाला आधीच दोन दिवसानंतर पाणी मिळते त्यात पाणी टंचाईच्या सुरुवातीच्या टप्यातच आता आठ आठ दिवसानंतर पाणी दिले जात आहे.ज्या प्रकारे दुष्काळी भागात पाण्याची परिस्थिती असते तशी परिस्थिती शिरोळची या पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे निर्माण झाली आहे.दोन नद्या असलेल्या गावाला आठ दिवसांनी पाणी मिळते हे कोणाला सांगून पण पटणार नाही पण नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार आणि कारभाऱ्यांचे जनतेशी देणंघेणं नसणं यामुळे शिरोळ वासियांना त्रास होत आहे.नगरपरिषद एक महिना कर उशिरा भरला म्हणून 2% दंड व्याज लावते कारण तशी कायद्यात तरतूद आहे म्हणून तसं नागरिकांना दररोज पाणी देणं ही सुद्धा नगर परिषदेची कायदेशीर जबाबदारी आहे ती मात्र पार पाडली जात नाही. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा पुन्हा नगर परिषदेवर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता पण येत्या दोन दिवसात शहरात नियमित एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले.नागरिकांनी शिरोळ नगरपरिषदेवर पाणी पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करा म्हणून घागर मोर्चा काढला.या मोर्चात श्रीकांत गावडे,शहाजी गावडे,कृष्णा देशमुख,अमोल गावडे,शशिकांत काळे,संपत मोडके-पाटील,राजेंद्र चुडमुंगे,एकनाथ माने, राहुल माने, दीपक काळे,अजित देशमुख,पोपट राणे-संकपाळ,बाबू मोरे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.
Spread the love
error: Content is protected !!