मराठीचं जगणं म्हणजे आपल्या अनुभूतीचं जगणं!

दुकानांमध्ये, मॉलमध्ये गेल्यावर मराठी संभाषणाची लाज वाटून ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्ट्स ?’ असं विचारणाऱ्या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा गौरव दिनाच्या बळेच शुभेच्छा… आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरणऱ्या गुणीजनांनाही कोरड्या शुभेच्छा!

 

खरेदीस गेल्यावर मराठी दुकानदारासमोर इंग्रजीत बोलून पुन्हा आपसात मराठीत बोलणाऱ्या मराठी दांपत्यास तर अनेकोत्तम शुभेच्छा!

 

दूरध्वनीवरचे संभाषण अकारण हिंदी इंग्रजीतून झाडणाऱ्या, कथित दृष्ट्या आपला रूबाब वाढवण्यासाठी(!) मराठी भाषेऐवजी इतर भाषांचा अंगीकार करणाऱ्या लोकांना त्रिवार शुभेच्छा..

 

 

फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणाऱ्या किंवा टीसी, जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणाऱ्या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा…

 

तसेच शब्दांचे मूळ रूप विद्रूप करून तै, बै, वेग्रे, लोक्स, कळतै, पैले असं पिळून काढलेलं स्वरूप देणाऱ्या प्रतिभावंतांनाही शुभेच्छा!

 

सोशल मीडियावर लेखन करताना दर वाक्यात इंग्रजी शब्द घुसडून लेखनाचे पुण्यकर्म करणाऱ्या महालेखकांनाही सकळ शुभेच्छा!

 

टॅक्सी, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, जहाज यातून प्रवास करताना किंवा अगदी पायी चालतानाही आपण मराठीत बोललो तर आपल्यावर अरिष्ट कोसळेल असं मानणाऱ्या भोळ्या भाबड्या मराठीप्रेमींनी काय घोडे मारलेय! त्यांनाही शुभेच्छा!

 

सार्वजनिक ठिकाणी, समारंभ वा सोहळ्यात मराठीचा वापर केल्यास कमीपणा येतो असं समजणाऱ्या मराठीजणांना तर अत्यंत मनस्वी शुभेच्छा!

 

आपल्या समोरील माणूस मराठीत बोलतोय म्हणजे तो अगदीच गेलाबाजार किरकोळ आहे असे वाटून अंगावर पाल पडल्यागत चेहरा करणाऱ्या मराठी माणसासही खूप खूप शुभेच्छा!

 

सरकारी कार्यालयात, कार्यप्रणालीत, कचेऱ्यात, बँकेत किंवा अनाहूत स्थळी गेल्यावर समोरील माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत बोलताना किमान एका शब्दासाठीही मराठीचा वापर न करणाऱ्या मराठी माणसासही आभाळभर शुभेच्छा!

 

मराठी वर्तमानपत्र विकत न घेणाऱ्या, वर्षभरात एकही मराठी पुस्तक विकत न घेणाऱ्या, कधीही मराठी नाटक – चित्रपट न पाहणाऱ्या, जाणीवपूर्वक मराठी वाहिन्या न पाहता इतर वाहिन्या पाहणाऱ्या, कधीही मराठी गाणं न गुणगुणणाऱ्या, मराठी नियतकालिकापासून दूर राहणाऱ्या तमाम मराठी माणसांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

आपली स्वाक्षरी देवनागरीत करता न येणाऱ्या, मराठी अंक लिहिण्यात असुलभता वाटणाऱ्या, जाणीवपूर्वक चुकीचे उच्चार करणाऱ्या सर्व मराठी भाषक जनतेस मराठी दिनाच्या अगणित शुभेच्छा!

 

मराठी मुळाक्षरे, बाराखडी, व्याकरण, गद्य, पद्य याबाबत मनात कमालीची रुक्षता असणाऱ्या कथित साक्षर जनतेस मराठी दिनाच्या शुष्क शुभेच्छा!

 

मराठीत लेखन केलं जावं म्हणून वा मराठीत बोललं जावं म्हणून कधीही, कुठेही आग्रह न धरणाऱ्या भेकड मराठी माणसालाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

 

फक्त मराठी दिनापुरते मराठीचे तुणतुणे वाजवणाऱ्या मराठी माणसास मराठी भाषा दिनाच्या जरतारी शुभेच्छा!

 

अशुद्ध उच्चार करणाऱ्या, अशुद्ध लिहिणाऱ्या लोकांना सातत्याने झोडपून काढलं तर आपलं मराठीप्रेम सार्थकी लागतं असं काहींना वाटतं त्यांना आजच्या दिवसाच्या विशेष शुभेच्छा!

 

मराठी दिनी भाषाप्रेमाचे ढोंग न करता, स्तोम न माजवता आयुष्यभर मराठीवर प्रेम करणाऱ्या खऱ्याखुऱ्या मराठी माणसास मात्र मराठी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा!

 

मराठी जगवण्यासाठीची उर्मी केवळ भाषाशुद्धतेचा व विक्षिप्त उच्चारकाठिण्य असणाऱ्या दुर्बोध शासकीय वापरातल्या शब्दांचा दैनंदिन जीवनात वापराचा आग्रह धरून टिकवता येणार नाही हे वास्तव स्वीकारायला हवं.

अनेक तद्दन जडशीळ, अगम्य, दुर्बोध, बोजड शब्द वापरण्याचा हेकेखोरपणा बंद करून रोजच्या जीवनातले सुलभ आणि अर्थवाही शब्द वापरण्यासाठी आग्रही राहिलं तर अधिक भलं होईल.

 

खेड्यापाड्यात वाड्यावस्त्यांवर बोलल्या जाणाऱ्या मराठीच्या बोली भाषेस धन्यवाद द्यायला हवेत कारण खऱ्या अर्थाने रसरशीत मराठी तिथे नैसर्गिक स्वरूपात जिवंत आहे! काही किलोमीटर अंतराच्या टापूनंतर तिचा बदलत जाणारा गेलं आणि शब्दकळा हे अस्सल सौंदर्य आहे! तिथे मराठी जगण्यासाठी कानीकपाळी आक्रोश करावा लागत नाही ती आपसूक सचेत राहते!

 

मराठी भाषेविषयी प्रेम जोपासणं म्हणजे अन्य भाषांचा तिरस्कार करणं, त्यांना कमी लेखणं, त्यांची कुचेष्टा करणं नव्हे! अन्य भाषांविषयीही आदर असायला हवा. निव्वळ मराठी अस्मितेच्या नावाखाली द्वेष पसरवणं हे तर अधिकच वाईट!

 

मराठी भाषा ही केवळ लिहिण्या, वाचण्या, बोलण्यापुरती नसून ती जगण्याची आसक्ती आहे ज्या दिवशी कळेल तो सुदिनच म्हणावा लागेल.

 

आपण जर अगदीच जीवावर येऊन मराठीत वाचत, बोलत, लिहित असलो तर आज शुभेच्छा देण्याघेण्यात काही हशील नाही.

 

केवळ औपचारिकता म्हणून, विचार आवडले म्हणून, प्रघात म्हणून किंवा आपणही मराठीवर प्रेम करतो हे दाखवून देण्यासाठी ह्या शुभेच्छा देण्यात काय अर्थ आहे?

 

मराठीचं जगणं म्हणजे आपल्या प्रकटनाचं, आपल्या अनुभूतीचं जगणं! मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या याचा अर्थ आपण या भाषेचं काही देणं लागतो, तिच्या प्रती आपली काही कर्तव्ये आहेत याचं भान येणं!

– – समीर गायकवाड

Spread the love
error: Content is protected !!