मराठी दिन महोत्सवात बालकलाकारांचा उत्कृष्ट नाट्याविष्कार

इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी दिन महोत्सव’ उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर, मिरज,इचलकरंजी येथील बालकलाकारांनी विविध आशयाचे उत्कृष्ट नाट्याविष्कार सादर करून विद्यार्थी आणि पालक रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य उत्सवात तीन बालनाट्ये सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध रंगकर्मी संजय हळदीकर कोल्हापूर, येथील रंगकर्मी अनिरुद्ध भागवत यांच्या हस्ते नटराज प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. “नाट्यकलेची आवड आणि अभ्यास हा मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरू शकतो” असे उदगार हळदीकर यांनी काढले. यावेळी अनिरुद्ध भागवत यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर देवल क्लबचे आसिफ सनदे, इंद्रधनु संस्थेचे देवांग जोशी आणि मराठी मिडीयम हायस्कूलचे नंदकुमार गाडेकर उपस्थित होते.

सुरुवातीला नाट्य परिषदेचे कार्यवाह संतोष आबाळे यांनी स्वागत केले तर उपाध्यक्ष मिलिंद दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. मर्दा फाउंडेशनच्या प्रतिनिधी सौ. प्रेमा मर्दा, रोटरी क्लब सेंट्रलचे सेक्रेटरी सुरेश चौगुले आणि उपक्रम समन्वयक संजय होगाडे यांच्या हस्ते पाहुण्यांना गुलाब पुष्प प्रदान करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध दांडेकर यांनी केले.या दिवशी प्रथम ‘राखेतून उडाला मोर’ हे बालनाट्य गायन समाज देवल क्लब कोल्हापूर या संघाने सादर केले. डॉ. सतीश साळुंखे यांचे लेखन तर आसिफ सनदे यांचे दिग्दर्शन केले होते. स्मशानात राहणाऱ्या मसनजोगी समाजातील मुलांची हृदयस्पर्शी व्यथा या बालनाट्यातून मांडण्यात आली. या मुलांची परिस्थिती, त्यांची गरीबी याचे विदारक दर्शन या नाटकाने घडवले. यामधून बाहेर पडण्यासाठी शिक्षण घ्यावे लागेल हा विचार त्या मुलांमध्ये कसा रुजतो याचा प्रवास या बालनाट्याने दाखविला आणि रसिकांची दाद मिळवली.त्यानंतर मिरज येथील इंद्रधनू कलाविष्कार संस्था यांनी ईररिव्हर्सिबल हे बालनाट्य दमदारपणे सादर करून रेबीज या विकाराबाबत जागृती केली. या आशयपूर्ण बालनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन धनंजय जोशी यांनी केले होते. आज अनेकजण कुत्रे पाळत असतात पण अशा पाळीव कुत्र्याला काही कारणाने रेबीजची लागण झाली तर आपण सावधानता बाळगणे आवश्यक आहे अन्यथा आपणासही हा रोग होऊ शकतो. अशाच पाळीव कुत्र्यामुळे मुलाला होणारा रेबीज आणि त्यात त्याचा होणारा अंत ही शोकांत कथा या बालनाट्यात मांडण्यात आली होती.त्यानंतर येथील डीकेटीई नारायण मळा, मराठी मिडीयम हायस्कूल या संघाने हनुमान सुरवसे लिखित आणि कपिल पिसे दिग्दर्शीत हलगी सम्राट हे बालनाट्य अतिशय उत्तम प्रकारे सादर केले. एका गरीब घरातील मुलीला कलेची आवड असते आणि तिला हलगी वादनात सम्राट व्हायचं असतं. तिच्या वडिलांची इच्छा तिने शिक्षण घेऊन कलेक्टर व्हावं अशी असते. पण असहाय्य परिस्थितीमुळे आणि दुर्दैवाने दोघांचीही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही याची कथा यातून परिणामकारकपणे मांडण्यात आली.तिन्ही बालनाट्ये सामाजिक आशयाचा संदेश देणारी होती. सर्वच बालनाट्यातील विद्यार्थ्यांनी सहज सुंदर अभिनयाचे दर्शन घडविले. बालरसिक विद्यार्थी आणि पालकांनीही या बालनाट्यांना उत्तम प्रतिसाद दिला.शेवटी सचिन चौधरी यांनी आभार व्यक्त केले. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.

Spread the love
error: Content is protected !!