कन्या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी रमजान मुल्ला हे उपस्थित होते.

 

यावेळी कवी रमजान मुल्ला यांनी आपल्या विविध कवितांच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली. आपल्या भारदस्त आवाजात कवितेने क्रांती व्हायला पाहिजे, असे मत व्यक्त केले.काळजातून आलेल्या भावनांना अचूक शब्द भेटले तर त्याची अस्सल कविता होते.शब्दांना गाता गळा व गोड आवाज लाभला तर ती कविता रसिकमनांच्या काळजाचा ठाव घेते.

 

 

अत्यंत हळव्या मनाच्या या कवीने महाविद्यालयाच्या प्रांगणात आणि विद्यार्थिनींच्या काळजात कवितेचा पूल उभा केला.मुलगी ही मोठ्या भाग्याने जन्माला येते आणि ती फक्त राजाच्या घरी जन्माला आलेली राजकन्याच असते. तिचा राजा तिचे वडील असतात,असे ते यावेळी म्हणाले, मराठी व हिंदी मधील ख्यातनाम कवितांचे देखील त्यांनी दाखले दिले.

 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी हे उपस्थित होते. या प्रसंगी त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये साहित्यातील विविध उदाहरणे देत कविता आणि वाचक यांच्यातले संबंध आणि बदलती परिस्थिती यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले.
उजेडाचा उगम आपल्या मनामध्ये झाला पाहिजे‌.

 

सूर्य उगवला की संपूर्ण जगामध्ये उजेड पडतो, पण आपल्या मनातील अंधकार दूर करायचा असेल तर उजेड आपल्या मनामध्येच झाला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.त्रिशला कदम यांनी महाविद्यालयाने वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेत प्रास्ताविक व स्वागत केले.

 

यावेळी या समारंभाच्या स्वागताध्यक्ष सौ मनीषा गवळी यांनी महाविद्यालयाने वर्षभर केलेल्या उपक्रमांचे अहवाल वाचन केले. क्रीडा संचालक डॉ.सविता भोसले यांनी क्रीडा विभागाच्या अहवालाचे वाचन केले. दुपारच्या सत्रामध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये विद्यार्थिनींनी समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, मिमिक्री, एकपात्री प्रयोग अशा विविध कलांचे सादरीकरण केले.

 

यावेळी महाविद्यालयीन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य सुभाष बलवान, माजी विद्यार्थिंनी संघटनेच्या अध्यक्ष सौ.स्मिता बुगड, पदाधिकारी सौ. शिल्पा गांजवे उपस्थित होत्या. तर महाविद्यालयाचे गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.सुधाकर इंडी तसेच वरिष्ठ सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.विठ्ठल नाईक, कनिष्ठ सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ एकता जाधव, कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा.महेश गवंडी, वरिष्ठ विभाग प्रमुख प्रा.संगीता पाटील, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.अनिल कुंभार, प्रशासकीय प्रमुख संजय गुजर आदी उपस्थित होते.

 

 

यावेळी विविध विभागांमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ.प्रतिभा पैलवान यांनी करून दिली.तर सूत्रसंचालन प्रा.वर्षा पोतदार आणि प्रा.संदीप पाटील यांनी केले. आभार डॉ.संपदा टिपकुर्ले यांनी मानले.

 

यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Spread the love
error: Content is protected !!