नृसिंहवाडी / प्रतिनिधी
येथील दत्त मंदिर परिसरात श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास आजपासून सुरुवात झाली. उत्सवाचे मानकरी कागलकर बंधूंच्या घरातून कृष्णावेणी मातेची सालंकृत मूर्ती सवाद्य मिरवणूकीसह श्री दत्त मंदिर परिसरात आणण्यात आली. यावेळी कृष्णावेणी मातेच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
उत्सवाच्या मुख्य मंडपामध्ये मंत्रोच्चारणासह कृष्णावेणी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ब्रह्मवृंदाकडून जगतकल्याणासाठी मातेची प्रार्थना करण्यात आली.संपूर्ण मिरवणूक मार्गावर संस्कार भारतीतर्फे आकर्षक रांगोळी व सजावट केली होती.
यावेळी दुतर्फा महिलांनी कृष्णावेणी मातेचे औक्षण करत आरती केली.घोडे,भालदार,चोपदार,दिवटी,छत्र, चामरासह अनेक भाविक मिरवणुकीत सामील झाल्याने शोभा वाढली होती.मंदिराच्या उत्तर बाजूस दिमाखदार शामियाना व विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला आहे.
दुपारी महानैवेद्य झाल्यावर आरती व मंत्रपुष्प करण्यात आले. उत्सवाप्रसंगी नित्य पूजाअर्चेसह ब्रह्मवृंदातर्फे ऋकसंहिता, ब्राह्मण आरण्यक,श्री गुरुचरित्र, कृष्णामहात्म्य, श्रीमद् भागवत, श्रीसूक्त, रुद्रैकादशिनी, सप्तशती इत्यादीचे पारायण करण्यात येणार आहेत.
एकविरा भगिनी मंडळातर्फे कृष्णालहरी पठण करण्यात येणार आहे. पुढील दहा दिवसांत गायन, वादन, कीर्तन, अभंगवाणी, शास्त्रीय-नाट्य-भक्ती संगीत, प्रवचन, आशीर्वचन असे विविध कार्यक्रम होणार आहे. आजपासून पुढील दहा दिवस साजऱ्या होणाऱ्या उत्सवाची तयारी महिनाभरापासून सुरू होती.