प्रबोधिनीच्या एन. डी .स्मृती अंकाचे प्रकाशन
इचलकरंजी : प्रतिनिधी
प्रा.डॉ.एन.डी.पाटील हे महाराष्ट्राच्या समाज प्रबोधन व परिवर्तनाच्या चळवळीतील एक बुलंद नेते होते.गेल्या साठ-सत्तर वर्षात त्यांनी केलेल्या चळवळी,आंदोलने आणि त्या माध्यमातून मांडलेले विचार हे वर्तमानासाठी व भविष्यासाठी फार मोठे मार्गदर्शक स्वरूपाचे संचित आहे.सर्वांगीण समता प्रस्थापनेची समाजाच्या शेवटच्या माणसाच्या उत्थानाची विचारधारा ते सतत मांडत राहिले.
समाजवादी प्रबोधिनीच्या प्रा.डॉ.एन.डी.पाटील स्मृतीअंकामधून त्यांच्या समग्र विचारधारेचे दर्शन घडते. या अंकाच्या माध्यमातून प्रा.एन.डी.पाटील यांचा वसा आणि वारसा पुढे नेण्यास निश्चितच बळ मिळेल असे मत क्रांती उद्योग समूहाचे नेते आणि पुणे पदवीधर विभागाचे आमदार अरूण लाड यांनी केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाच्या ज्येष्ठ विचारवंत नेते, समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष कालवश “प्रा. डॉ. एन. डी .पाटील स्मृती अंकाचे ” प्रकाशन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्ही.वाय.पाटील होते.
प्रारंभी समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस कालवश आचार्य शांतारामबापू करून यांच्या ९७ व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक आदम पठाण यांनी केले. रामानंदनगर ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मंचावर रामानंदनगरच्या सरपंच सुमैया कोल्हापुरे, मारुती शिरतोडे, ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार अरूण लाड यांच्या हस्ते प्रसाद कुलकर्णी यांना दीनबंधु भाई दिनकरराव यादव जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या अंकाचे संपादक प्रसाद कुलकर्णी म्हणाले, प्रा. डॉ .एन.डी.पाटील हे महाराष्ट्राच्या वाटचालीतील एक बुलंद असे नेतृत्व होते. सत्ताधाऱ्यांवर त्यांचा नैतिक धाक होता.आणि सर्वसामान्य माणसांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. विविध प्रश्नांवर रस्त्यावरचे लढा आणि सभागृहातील लढे त्यांनी सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर लढले.
या स्मृती अंकामध्ये त्यांच्या जीवन कार्याच्या विविध अंगावर प्रकाश टाकणारे प्रा.डॉ.अशोक चौसाळकर, प्रा.डॉ.भारती पाटील,प्रा.डॉ. भालबा विभुते,प्राचार्य डॉ. टी.एस.पाटील,किशोर बेडकिहाळ,प्रा.डॉ.एकनाथ पाटील,प्रा.डॉ. सूर्यकांत गायकवाड,दशरथ पारेकर ,विक्रांत पाटील,प्रसाद कुलकर्णी आदींचे लेख आहेत.
अध्यक्षस्थानावरून बोलताना व्ही.वाय.पाटील म्हणाले, एक सकस स्वरूपाची वैचारिक शिदोरी देणारे मासिक म्हणून समाजवादी प्रबोधिनीच्या’ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ या मासिकाचा राज्यभर लौकिक आहे. गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या आणि समाजाला विचारधन देणाऱ्या या मासिकाचे प्रत्येक सजग ,जागरूक व्यक्तीने वर्गणीदार वाचक होणे गरजेचे आहे.
एन.डी.पाटील स्मृतीअंक ही त्यांच्या कार्यकर्तुत्वाला वाहिलेली खरी आदरांजली आहे.यावेळी प्राचार्य डॉ. आर . एस.डूबल , प्रा.दादासाहेब ढेरे ,डॉ. गजेंद्र शिखरे ,डॉ.जगन्नाथ पाटील, संपतराव गायकवाड, प्रा. उत्तम सदामते ,रमेश लाड, प्रा.डॉ.बी.एन.पवार,प्रा. रविंद्र येवले, हिम्मतराव मलमे, यशवंत बाबर,प्राचार्य तानाजीराव चव्हाण, हंबीरराव मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.आभार मारुती शिरतोडे यांनी मानले.