कुरुंदवाड / प्रतिनिधी
सांगली येथील संतोष कदम यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या संशयित तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्याकडे वर्ग तर सांगलीतील आणखीन 2 संशयित आरोपी निष्पन्न.
शोधासाठी कर्नाटक राज्यात व सांगली जिल्ह्यात तीन पथके रवाना.संशयित आरोपी तुषार महेश भिसे,नितेश दिलीप वराळे,सूरज प्रकाश जाधव यांना मिळालेल्या 5 दिवसाच्या पोलीस कोठडीची बुधवारी मुदत संपली होती.5 दिवसाच्या चौकशीत सांगलीतील संशयित आरोपी बाबा उर्फ सिद्धार्थ चिपरीकर,शहारूख शेख यांची नावे निष्पन्न झाली असून त्याच्या शोधासाठी गुन्हे अन्वेषण शाखा आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याची 2 पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक समिरसिंह साळवे यांनी दिली.
संतोष विष्णु कदम याच्या खून प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी 24 तासातच तीन संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून खुनात वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.पाच दिवसाच्या पोलीस तपासातून आणखीन दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
संतोष कदम यांच्या पत्नी स्नेहा कदम आणि पुतण्या प्रफुल कदम यांनी सपोनि रविराज फडणीस यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत आय.पी.एस अधिकाऱ्यांच्यावतीने खुनाचा तपास करावा अशी मागणी पोलीस महानिरीक्षकांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या गुन्ह्याचा तपास इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांच्याकडे वर्ग केला आहे.संशयित तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने पोलीस प्रशासनापुढे नव्याने निष्पन्न झालेल्या दोन संशयित आरोपींना गजाआड करणे हे एक आव्हान निर्माण झाले आहे.