कुरुंदवाड / प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना येथील मराठा समाजाने पाठिंबा व्यक्त करून महाराष्ट्र शासनाने आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाची दिशाभूल केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी 16 तारखेला कुरुंदवाड बंदची हाक दिली आहे.
येथील मारुती मंदिर येथे बुधवारी सकाळी 11 वाजता सकल मराठा समाजबांधवांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते शहर बंदचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी बोलताना दयानंद मालवेकर,तुकाराम पवार म्हणाले की, जोपर्यंत सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मनोज जरंगे पाटील हे उपोषणावर ठाम राहिले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मराठ्यांना कुणबी हा त्यावेळीच दाखला दिला आहे.आणि हे राज्य सरकार आरक्षण देत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने घोषणा करून वेळ मारून नेण्याचे कृत्य केले आहे. आरक्षण जाहीर केलेच आहे तर याबाबत अधिवेशन बोलवून मागण्या पूर्ण करणे या राज्य सरकारला लाज वाटत आहे का?असा टोला लागला.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने समस्त सकल मराठा समाज बांधव संतापला असून शुक्रवारी कुरुंदवाड शहर बंदची हाक दिली आहे.यावेळी जेष्ठ नेते रामचंद्र मोहिते, रमेश भुजुगडे, बबलू पवार, प्रवीण खबाले, तानाजी आलासे, मिलिंद गोरे, राजू आवळे, राजेंद्र बेले, आनंद बेले, जितेंद्र साळुंखे, संजय चव्हाण, नायकू दळवी, अनिल पवार, विजय चव्हाण, यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.